Mamata Banerjee: ममता बॅनर्जी हाजीर हो! माझगाव दंडाधिकारी कोर्टानं जारी केलं समन्स
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 2 मार्चच्या सुनावणीसाठी मुंबईत कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई: पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबईतील माझगाव दंडाधिकारी न्यायालयानं समन्स बजावलं आहे. राष्ट्रगीताचा अनादर केल्याचा दावा करत मुंबईतील एका भाजप कार्यकर्त्याने केलेल्या फौजदारी तक्रारीची दखल घेत न्यायालयानं 2 मार्चला होणाऱ्या पुढील सुनावणीसाठी ममता बॅनर्जी यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईतील कफ परेड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात 1 डिसेंबर 2021 रोजी पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमाच्या शेवटी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बसूनच राष्ट्रगीत बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या उभे राहून पुढे राष्ट्रगीताच्या दोन ओळी म्हणून कार्यक्रमातून निघून गेल्या. ही क्लिप सोशल मीडियावर पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे (भाजप) मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी कफ परेड पोलीस ठाणयात याबाबत तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी त्यावर कोणतिही कारवाई न केल्यानं त्यांनी शिवडी येथील माझगाव दंडाधिकारी न्यायालयात याबाबत तक्रार दाखल केली. ममता बॅनर्जींचे कृत्य म्हणजे राष्ट्रगीताचा अवमान आणि अनादर असून साल 1971 च्या राष्ट्रीय सन्मानाच्या अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार त्या शिक्षेस पात्र असल्याचा दावा गुप्ता यांनी केला. त्यावर दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांच्यासमोर नुकतीच सुनावणी पार पडली. त्या आदेशाची प्रत मंगळवारी जाहीर करण्यात आली.
तक्रारदारांनी या प्रकरणी डिव्हीडी, व्हिडीओ क्लिप, यृट्यूबवरील लिंक न्यायालयात पुरावे म्हणून सादर केलेत. केलेल्या तक्रारीची पडताळणी करताना प्रथमदर्शनी असे आढळून येते की, आरोपी (ममता बॅनर्जी) यांनी कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रगीत गायलं मात्र मध्येच त्या अचानक थांबल्या आणि त्यांनी व्यासपीठ सोडल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच जरी त्या न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर असल्या तरीही फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अंतर्गत पोलिसांनी बॅनर्जींविरोधात कारवाई प्रक्रिया पुढे ढकल्याचं कोणतेही कारण आढळून येत नाही. बॅनर्जी या राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 अन्वये शिक्षेस पात्र असल्याचं दंडाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद करत त्यांना 2 मार्च रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे समन्स बजावलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Mamata Banerjee: प्रादेशिक पक्षांनो... भाजपला पराभूत करायचं असेल तर एकत्र या; ममता बॅनर्जींचे आवाहन
- अस्थिर लोकांना घेऊन ममता बॅनर्जींना गोव्यातील नव्या सकाळचं स्वप्न पडलंय, राऊतांची दीदींवर 'रोखठोक' टीका
- पंतप्रधानांच्या हस्ते चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या दुसऱ्या संकुलाचे उद्घाटन, ममता बॅनर्जी म्हणाल्या...