मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, मुंबईचा डबलिंग रेट 14.5 दिवसांवर
डिस्चार्ज पॉलिसी आणि वाढलेल्या डबलिंग रेटकडे पाहता आपण परिस्थितीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेऊ शकतो. आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवून आपल्याला यश मिळणार असेल तर वाढलेल्या लॉकडाऊनचं स्वागतच केलं पाहिजे, असं मुबंई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं.
मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी विभागवार सात आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे मुंबईचा डबलिंग रेट 14.5 दिवसांवर गेला आहे. केंद्र सरकारची डिस्चार्ज पॉलिसी कोटेकोरपणे पाळली जात आहे. डिस्चार्ज पॉलिसी आणि वाढलेल्या डबलिंग रेटकडे पाहता आपण परिस्थितीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेऊ शकतो. आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवून आपल्याला यश मिळणार असेल तर वाढलेल्या लॉकडाऊनचं स्वागतच केलं पाहिजे, असं मुबंई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं.
वानखेडे सारखे ओपन ग्राऊंड घेतले आणि पावसाळ्यात चिखल झाला तर परिस्थिती कठीण होईल. आपल्याकडे पार्किंगच्या मोठ्या जागा आहेत. इतर ठिकाणी व्यवस्था केली जाईल. त्यामुळे वानखेडे ताब्यात घेणार नाही, असंही आय़ुक्तांनी सांगितलं. एक लाख बेड्सची सुविधा केली जात आहे. 50 हजारांचं लक्ष्य जवळपास पूर्ण झालंय. हॉटेल्स आणि इतर काही ठिकाणांना ताब्यात घेतलं. खाजगी हॉस्पिटलकडून काही हजार बेड्स कोविड रुग्णांसाठी मिळतील. खाजगी हॉस्पिटलचे 100 टक्के आयसीयू बेड्स आणि 80 टक्के इतर बेड्स ताब्यात घेतले जातील, अशी माहिती मुबंई महापालिका आयुक्तांनी दिली.
कंटेंटमेंट झोनची पुनर्रचना केली आहे. एका पेशंटसाठी संपूर्ण परिसर कंटेंटमेंट झोन केल्यानं यंत्रणेवरचा ताण वाढत होता. त्याऐवजी आता काही इमारती सील केल्या जातील. यात लोकसहभागातून सुविधा पुरवल्या जातील. केवळ वैद्यकीय सुविधा महापालिका देईल. अॅम्ब्युलन्स 80 होत्या त्यांची संख्या 350 झाली. उद्यापासून या अॅब्युलन्स रस्त्यावर सेवेत दिसतील, यात बेस्टच्या कन्व्हर्टेड अॅम्ब्युलन्सही असतील, असं मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं.
गेल्या आठवड्यात 50 डॉक्टर वर्ध्यातून आले. 100 डॉक्टर आंबाजोगाई, लातुरहून येत आहेत. केवळ हॉस्पिटलधील आया, वॉर्डबॉय यांची कमतरता आहे. कारण हे खूप लांबून प्रवास करुन मुंबईत येत आहेत. त्यांना 8 तास काम करुन 6 तासांचा प्रवास करावा लागतोय. त्यांच्यासाठी कामाच्या वेळांमध्ये बदल किंवा जवळच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होईल, असे प्रयत्न सुरु आहेत.
Lockdown 4.0 | मुंबईत एक लाख बेड्सचं नियोजन सुरु; मुंबई पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची पत्रकार परिषद