Mumbai Corona Cases : एकवेळी सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतही रुग्णसंख्यावाढीचा वेग!
Mumbai Corona Update : राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठलाय. सोबतच, मुंबईत एकेवेळी सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतही आता रुग्णसंख्यावाढीनं वेग घेतलाय.
मुंबई : राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठलाय. सोबतच, मुंबईत एकेवेळी सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतही आता रुग्णसंख्यावाढीनं वेग घेतलाय. धारावीमध्ये कोरोनाला नियंत्रणात आणण्यात महापालिकेला यश आले असले तरी पुन्हा पुन्हा एकदा या आजाराने उचल खाल्लेली पाहायला मिळत आहे. काल या भागात तब्बल 30 रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी 33 रुग्ण आणि त्यापूर्वी 1 जून रोजी 34 रुग्ण समोर आले होते. परंतु त्यानंतर या भागातील रुग्ण संख्या एकेरी आकड्यात आली होती.
मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागात मोडणाऱ्या धारावी, दादर आणि माहिम या तिन्ही भागांमध्ये रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली. या जी उत्तर विभागात काल 102 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये धारावीमध्ये 30 रुग्ण, दादरमध्ये 41 आणि माहिममध्ये 31 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या जी उत्तर विभागात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 14 हजार 950 एवढी झाली आहे. दादर-माहिम या भागातील दादरमध्ये सर्वाधिक 41 रुग्ण असून माहिममध्ये 31 रुग्ण आढळून आले आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येचा उच्चांक
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला असून काल 18 मार्च रोजी दिवसभरात तब्बल 2877 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. मागील वर्षीच्या 7 ऑक्टोबरला ही संख्या 2848 होती. त्यानंतर कोरोना उतरणीला आला. मात्र आज रुग्णसंख्येने रेकॉर्डब्रेक केल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
मुंबईत मागील वर्षी मार्च महिन्यांत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. एप्रिल मे, जूननंतर कोरोनाने कहर केला होता. त्यानंतर 7 ऑक्टोबरला ही रुग्णसंख्या 2848 पर्यंत पोहोचली. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या होती. मात्र त्यानंतर महापालिकेच्या प्रभावी उपाययोजना आणि कठोर अंमलबजावणीमुळे कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. त्यामुळे अनलॉक प्रक्रिया टप्प्याटप्प्याने शिथील केल्याने सार्वजनिक ठिकाणी असलेले व्यवहार पुन्हा सुरु झाले. मात्र कोरोनाचा धोका कमी कायम असल्याने कोरोना नियमाचे पालन करणे बंधनकारक होते. मात्र वाढलेली गर्दी आणि लोकांनी कोरोना नियमाचे पालन न केल्याने ही संख्या पुन्हा वाढली आहे.
Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक! सरकारसमोर मोठं आव्हान
राज्यात 25 हजार 833 नव्या रुग्णांची नोंद
काल राज्यात तब्बल 25,833 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेडचा समावेश आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः लॉकडाऊन लावूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.