Chhath Puja : भाजपने 'छटपुजे'साठी कंबर कसली, उत्तर भारतीयांच्या मतपेढीसाठी मुंबईत मोठं नियोजन
Mumbai Chhath Puja 2025: मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेतला छटपुजेचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे. त्याच्या नियोजनासाठी भाजपचे दोन वरिष्ठ नेते त्यावर लक्ष ठेऊन आहेत.

मुंबई : उत्तर भारतीय मतं आकर्षित करण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली असून छटपूजासाठी (Chhath Puja) मोठं नियोजन करण्यात येत आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम हे छटपूजेच्या तयारीसाठी प्रशासनाकडून आढावा घेणार आहेत. शुक्रवारी दुपारी 1 वाजता ते महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसोबत याबाबत चर्चा करणार आहेत.
देशभरात येत्या 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या दरम्यान छटपूजेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मुंबईतही मोठ्या प्रमाणात छटपूजा साजरी केली जाते. यंदाची छटपूजा ही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याने भाजपकडून त्यावर लक्ष केंद्रीत केलं जात आहे.
Chhath Puja Mumbai : छटपुजेसाठी कंबर कसली
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपकडून उत्तर भारतीयांचा खूश करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच छटपुजा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी नियोजन केलं जात आहे. तसेच महापालिकेच्या वतीने छटपुजेसाठी काय नियोजन करण्यात येणार आहे त्याचा आढावा भाजपकडून घेतला जात आहे.
भाजपकडून याची जबाबदारी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबईचे अध्यक्ष अमीत साटम यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भाजपचे हे दोन्ही नेते महापालिका आयुक्त आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करणार आहेत.
BMC Election : महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढणार
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरु आहेत. या दोन्ही नेत्यांची ताकद, सर्वाधिक मतदार हे मुंबईत असून प्रामुख्यानं मराठी मतदारांवर या दोघांची मदार आहे. त्यामुळे भाजपनं ही संभाव्य युती लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या आमदारांना याआधीच काही निर्देश दिले आहेत. मुंबईत महायुतीत कुठेही वाद नको, समन्वय राखा अशा सूचना दिल्या आहेत, त्यामुळे भाजप मुंबई महापालिका निवडणुका महायुतीतूनच लढणार हे जवळपास स्पष्ट आहे.
BJP Mission Mumbai : मुंबईसाठी भाजपनं काय प्लॅन आखला?
- मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर.
- मुंबई महापालिका जिंकणं सर्व आमदारांची जबाबदारी.
- मुंबईतील भाजपचा आमदार प्रत्येक वॉर्डातील समस्या जाणून घेणार.
- मुंबईत महायुतीत कुठेही वाद नको, समन्वय राखा, मुख्यमंत्र्यांची सूचना.
याशिवाय 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा, दुसऱ्या क्रमांकावरची मतं मिळालेल्या जागा निवडून आणण्याकरता भाजपचा प्रयत्न राहील.
ही बातमी वाचा:
























