BMC : मुंबईतील नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ, प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून स्पष्ट
मुंबईत वायू प्रदूषणाच्यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी 237 टक्क्यांनी तर मल निसारणासंबंधी नागरिकांच्या तक्रारी 35 टक्क्यांनी वाढल्याचं प्रजा फाउंडेशनच्या अहवालात म्हटलं आहे.
मुंबई: प्रजा फाउंडेशनने (Praja Foundation Report) 'मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती 2023' हा अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालामुळे मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन, मल नि:सारण आणि हवा आणि पाण्याच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधले आहे. मागील काही वर्षात मुंबईतील नागरिकांच्या समस्यांच्या संदर्भातील तक्रारी वाढल्याचे दिसत आहे. मुंबईत 2013 पासून ते 2022 पर्यत नागरिकांच्या वायू प्रदूषणाच्या तक्रारीमध्ये 237 टक्क्यांनी वाढ झाली असून घनकचरा व्यवस्थापनाच्या तक्रारी मध्ये देखील
124 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या वर्षात नागरिकांच्या तक्रारी एक लाखांच्या वरती गेल्या होत्या. बीएमसीकडे 2021 मध्ये 90,250 तक्रारींची नोंद झाली होती. तर 2022 मध्ये याच तक्रारींमध्ये वाढ होवून तब्बल 1,04,068 तक्रारींची नोंद झाली आहे. मार्च 2022 मध्ये बीएमसी स्वच्छ भारत अभियानातील 'कचरा मुक्त शहर' या योजनेअंतर्गत पंचतारांकित मूल्यांकन प्राप्त करण्यास अपयशी ठरली होती.
मुंबईचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने घन कचरा व्यवस्थापने (Solid Waste Management) संबंधी नागरिकांच्या तक्रारी या वाढल्याचं समोर येत आहे. मागील दहा वर्षाच्या तुलनेत या तक्रारींमध्ये 124 टक्क्याने वाढ झाली आहे. यामध्ये वायूप्रदूषण तसेच मल निसारण या संबंधी देखील तक्रारी वाढल्या आहेत. मोठे शहर असल्या कारणाने या रोजच्या समस्या आहेत. यामुळे शहरात वायू प्रदूषणाच्यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी 237 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर मल निसारणासंबंधी नागरिकांच्या तक्रारी 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 2022 मध्ये तक्रारी सोडवण्याचा कालावधी हा 31 दिवस होता. मात्र अजूनही या तक्रारींचे निवारण करण्यात आलेले नाही.
सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे अकार्यक्षम स्वच्छता तसेच कचरा व्यवस्थापन प्रकियेमुळे मुंबई शहराला वायू प्रदूषण, उष्णतेच्या लाटा आणि प्रदूषित पाण्याचे स्रोत अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्यांमध्ये प्रभावी घन कचरा व्यवस्थापनाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने घन कचरा व्यवस्थापन नियमावली 2016 च्या घन कचरा व्यवस्थापन नियमानुसार सुधारणा करणे हे प्रथम पाऊल ठरेल. घन कचरा व्यवस्थापन नियमावलीला प्राथमिकता देण्यासाठी, विचार विनिमय करण्यासाठी आणि नवीन नियमावली तयार करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये निर्वाचित लोकप्रतिनिधींची आवश्यकता असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
कोरोनानंतर विद्यार्थी संख्येत वाढ
कोरोनानंतर मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 42 टक्क्यांनी वाढली असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई महापालिकांच्या शाळांच्या स्थिती संदर्भातला प्रजा फाउंडेशनचा अहवाल जाहीर झाला असून त्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. बीएमसी मराठी माध्यमांच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील दहा वर्षाच्या तुलनेत 51 टक्क्यांनी घसरली आहे. तर इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली असल्याचंही हा अहवाल सांगतोय.