BMC : मुंबईकरांनो 'स्टिंग रे' , 'जेलीफीश' पासून सावध; समुद्र किनाऱ्यावर अशी घ्या काळजी!
Mumbai News : मुंबईच्या समुद्र किनारी 'स्टिंग रे' , 'जेलीफीश' मासे आढळून आले आहेत. त्यांंच्याकडून दंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई किनारपट्टीवर ‘ब्लु बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीचा वावर अधिक दिसून येत असल्याने मुंबई महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी मत्सव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जुहू चौपाटी येथे भेट दिली होती. नागरिकांना ‘जेली फीशने दंश’ केल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती मत्स्यव्यवसाय विभागाने मुंबई महानगरपालिकेला केली.या कालावधीत नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करतानाच सुरक्षिततेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनांसाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. स्टींग रे’चा दंश झाल्यास नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा रक्षक यांनाही जेली फिश दंश बाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक '108' रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली आहे.
मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राधान्य देतानाच ‘जेली फीश दंश’ किंवा ‘स्टिंग रे’ दंश केल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने विभाग पातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश डी, जी उत्तर, के पश्चिम, पी उत्तर आणि आर मध्य या विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिले आहेत.
समुद्र किनारी काय काळजी घ्याल ?
नागरिकांनी समुद्रामध्ये जाताना उघड्या अंगाने जावू नये, तसेच पाण्यामध्ये जाणार असाल तर 'गमबुट' वापरावेत. लहान मुलांना पाण्यामध्ये जावू न देण्याची खबरदारी घ्यावी. माशांनी दंश केल्यास घाबरुन न जाता त्वरित महापालिका आरोग्य सेवेच्या केंद्रात त्वरित संपर्क साधावा. समुद्र किनाऱ्याच्या परिसरात महापालिकेतर्फे लावण्यात आलेल्या सूचना फलकांवरील आणि कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने चौपाट्यांवर असणाऱ्या वॉच टॉवरवरून नागरिकांना मेगाफोनवरून सूचना देणे, नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, अशा आशयाचे फलक प्रदर्शित करणे, तसेच चौपाटीवर फिरताना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करणे अशा प्रकारच्या उपाययोजना संबंधित विभाग कार्यालयाद्वारे करण्यात येत आहेत.
मस्त्यदंशासाठी प्रथमोपचार
- जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका
- जखम चोळली जाणार नाही किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घ्या
- मस्त्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढा
- जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.
स्टींग रे किंवा जेली फिशचा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपल्या नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.
मुंबईच्या किनारी स्टींग रे, जेलीफिशचा वावर का?
मुंबई येथील किनारपट्टी ही एक संरक्षित किनारपट्टी असून या किनारपट्टीला वेगवान पाण्याचा प्रवाह नाही. त्यामुळे जेलीफिश साख्या जलचरांसाठी येथे मुबलक प्रमाणात प्लवंग सदृश्य खाद्य तयार होत असते. त्यामुळे या कालावधीत प्लवंगाने उत्पन्न जास्त असल्यामुळे ‘ब्ल्यू बटन जेली’ सारख्या जलचरांचे उत्तमरित्या संगोपन आणि संवर्धन होते. याबरोबर सर्व किनारपट्टीवर कमी पाण्याचा प्रवाह किंवा संरक्षितपणा असल्यामुळे या किनारपट्टीच्या वालुकामय क्षेत्रामध्ये ‘स्टींग रे’ (पाकट) याचेही संवर्धन व संगोपन होत असते, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
