Omicron Virus : ओमिक्रॉनशी लढण्याकरता मुंबई सज्ज, पालिका आयुक्तांची ग्वाही
कोरोनाचा धोका कमी होतोय असं वाटतं असतानाच ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबईत या व्हेरियंटने धुमाकूळ घालण्याआधीच याविरुद्ध लढण्यासाठी शासन उपाययोजना करत आहे.
मुंबई : कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला मागील दोन वर्षांपासून विळखा घातला आहे. हा विळखा हळूहळू निसटतोय असं वाटतं असतानाच आता ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. दरम्यान हा नवा व्हायरस मुंबईत येण्यापूर्वीच याच्याशी दोन हात करण्याकरता मुंबई पालिका सज्ज झाली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी एबीपी माझाशी बोलताना पालिकेची आगामी रणनीती स्पष्ट केली.
चहल यांच्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून 1126 प्रवासी आतपर्यंत मुंबई विमानतळावर उतरले आहेत. त्यामुळे या सर्वांचं लोकेशन ट्रॅक करणं सध्या सुरु आहे. त्यातील 100 जण मुंबईतील असून इतर मुंबईच्या आसपासच्या आणि इतर जिल्ह्यांतील आहेत. दरम्यान यांना ट्रॅक केल्यानंतर त्यांची कोविड टेस्ट करुन पॉझिटीव्ह आढळल्यास जिनोम सिक्वेंसिंगही केलं जाणार आहे. तसंच दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या विमानांबाबत निर्णय घेऊन संस्थात्मक विलगीकरणाची नवी पॉलिसी केंद्रानं बनवावी अशी विनंतीही केंद्राकडे केल्याची माहिती चहल यांनी दिल्या.
लसीकरणाचा वेगही वाढवणार
पालिका आयुक्त चहल यांनी लसीकरणाबाबत माहिती देताना ते म्हणाले, ''दुसरा डोसाची मुदत उलटून गेलेल्यांकरता लसीकरण मोहिम वेगानं राबवलं जाणार आहे. तसंच मुंबईसाठी विशेष बदल म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या डोसातील अंतरही कमी करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे''
नियमांबात जागृकता वाढवणार
चहल यांनी शाळा 15 डिसेंबरपासूनच सुरु करणार असल्याच्या निर्णयाबाबत पुन्हा पुष्टी केली. तसंच आगामी महापरिनिर्वाण दिनाला अनुयायांना गर्दी न करण्याचं आवाहनही केलं आहे. तसंच 400 टन क्षमतेची ऑक्सिजन व्यवस्था, ऑक्सिजन प्लांट यांची पाहणी करुन जम्बो कोविड सेंटरची परिस्थिती तपासण्यासाठी रंगीत तालीम होणार आहे. तसंच नो मास्कची कारवाई अधिक तीव्र करणार असून मॉल, रेस्टॉरंट, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक येथे लसीचे दोन डोस असणाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच विविध कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोसही अनिवार्य करणार आहे.
पाहा व्हिडीओ