Nawab Malik : मुंबईत नवाब मलिकांकडे नेतृत्व द्याल तर राष्ट्रवादीसोबत युती नाही; भाजपची स्पष्ट भूमिका
BMC Election : नवाब मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तीच भूमिका आता शिंदेंच्या शिवसेनेने घेतली आहे.

मुंबई : एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंमुळे मुंबईत मविआमध्ये बिघाडी झाली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांमुळे (Nawab Malik) महायुतीत मिठाचा खडा पडण्याची चिन्हं आहेत. नवाब मलिकांना सोबत घेण्यास भाजप राजी नाही. त्यामुळे मुंबईत केवळ शिंदेंची शिवसेना आणि भाजप घरोबा करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
मुंबई महापालिकेसाठी नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणार असतील तर भाजप-राष्ट्रवादीसोबत मुंबईत युती करणार नाही असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन, आशिष शेलार आणि अमित साठम यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वतंत्र लढावं लागणार आहे.
नवाब मलिकांना आधी भाजपने विरोध केला, त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनेही तीच री ओढली. नवाब मलिकांबाबत जी भूमिका भाजपची तीच शिवसेनेची असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी म्हंटलय.
Nawab Malik NCP : राष्ट्रवादीचे नेतृत्व नवाब मलिकांकडेच
ज्या नबाव मलिकांमुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे त्यांच्यावरच अजित पवारांनी मुंबई महापालिकांची पूर्ण जबाबदारी टाकली आहे. मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं तातडीची बैठक घेतली. या बैठकीला झिशान सिद्दीकी आणि सना मलिकही हजर होते. मुंबईत महायुती म्हणून लढण्यास विरोध होत असताना पुढील रणनीती नेमकी काय असणार यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
Mumbai NCP : राष्ट्रवादीची 50 जागांवर तयारी पूर्ण
नवाब मलिकांना भाजपने विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीने महायुतीसोबत किंवा महायुती शिवाय लढण्याची तयारी ठेवली आहे. मुंबईत किमान 50 जागा लढवण्याची तयारी राष्ट्रवादीने केली असल्याची माहिती आहे. तर महायुतीत राहायचं की नाही याचा निर्णय अजित पवारांकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे.
BMC Election : भाजप-शिंदेंची पहिली बैठक
नवाब मलिकांच्या नावामुळे राष्ट्रवादीला डावलत मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची पहिली संयुक्त बैठक पार पडली. यावेळी मुंबईत 150 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. तसंच येत्या एक ते दोन दिवसात अंतिम जागावाटप पूर्ण करणार असल्याचं आशिष शेलारांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, ज्या जागेवर पक्षाचे विद्यमान नगरसेवक आहेत ती जागा त्याच पक्षाला देण्यात यावी याविषयी या बैठकीत एकमत झाल्याची माहिती पुढे आली. तर काही जागांची अदलाबदली होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली. गुरुवारी पुन्हा एकदा महायुतीच्या जागावाटपाबाबत मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. तसंच जागावाटपाच्या प्रक्रियेतून महायुतीची प्रतिमा मलिन होऊ नये आणि कोणताही वाद बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही बातमी वाचा:






















