Mumbai News: मुंबईकरांसाठी वाईट बातमी! बेस्ट बसच्या तिकीटाचे दर वाढणार, किती पैसे मोजावे लागणार?
Mumbai News: मुंबईकरांवर बस भाडेवाढीचा भार; बेस्टच्या प्रस्तावाला पालिकेचा हिरवा कंदील. हा निर्णय अंमलात आल्यास मुंबईतील हजार गोरगरीब नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे.

Mumbai BEST Bus News: मुंबईत लाखो नागरिकांसाठी लाईफलाईन ठरलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. बेस्ट उपक्रमाने सादर केलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिका (BMC_ प्रशासनाने मंजुरी दिली असून, आता केवळ परिवहन प्राधिकरणाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. मंजुरी मिळताच नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. या प्रस्तावित भाडेवाढीनुसार बेस्ट बसच्या तिकीट दरात (BEST bus ticket) दुप्पटीने वाढ होणार असल्याची माहिती आहे. (Mumbai News)
बेस्टच्या आर्थिक डबघाईवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत बेस्टच्या महसुलात वाढ करण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बेस्टला स्वतःचे उत्पन्नवाढीचे मार्ग शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बेस्ट प्रशासनाने भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे रेटला. या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिल्याने ही भाडेवाढ अटळ मानली जात आहे. तसे झाल्यास अगोदरच महागाईने गांजलेल्या मुंबईकरांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. अनेक सामान्य नागरिक रिक्षा, टॅक्सी अशा खासगी वाहनांऐवजी माफक दरात वाहतूक सेवा पुरवणाऱ्या बेस्ट बसला पसंती देतात. मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये बेस्ट बसला शेअर टॅक्सी आणि शेअर ऑटो रिक्षाचा पर्याय आहे. मात्र, शेअर रिक्षा आणि टॅक्सीचे भाडेही मुंबईतील अनेक गरीब वर्गाला परवडत नाही. त्यामुळे हे लोक तासनतास बसच्या रांगेत उभे राहून प्रवास करतात. मात्र, आता बेस्ट बसच्या तिकीटाच्या दरात दुप्पटीने वाढ झाल्यास या गरीब वर्गाला मोठा फटका बसणार आहे.
बसचं तिकीट किती रुपयांनी वाढणार?
| अंतर (किमी) | सध्याचे भाडे | प्रस्तावित भाडे | |
| 5 किलोमीटर | 5 रुपये | 10 रुपये | |
| 10 किलोमीटर | 10 रुपये | 15 रुपये | |
| 15 किलोमीटर | 15 रुपये | 20 रुपये | |
| 20 किलोमीटर | 20 रुपये | 30 रुपये |
वातानुकुलित एसी बसचे तिकीट किती रुपयांनी वाढणार?
| अंतर (किमी) | सध्याचे भाडे | प्रस्तावित भाडे |
| 5 किलोमीटर | 6 रुपये | 12 रुपये |
| 10 किलोमीटर | 13 रुपये | 20 रुपये |
| 15 किलोमीटर | 19 रुपये | 30 रुपये |
| 20 किलोमीटर | 25 रुपये | 25 रुपये |
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाडेवाढ होणार?
पुढील काही महिन्यांत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रिक्षाच्या मीटरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता बेस्ट तिकीटांचे दर वाढल्यास सामान्य लोकांमध्ये नाराजी पसरु शकते. त्यामुळे बेस्टची भाडेवाढ कधी होणार, हे बघावे लागेल.
आणखी वाचा























