Mumbai Bank : आदित्य ठाकरेंचा सर्वात मोठा झटका, प्रवीण दरेकरांच्या हातून मुंबै बँकेची सत्ता खेचली
राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे हे मुंबई जिल्हा बँकेचे नवे अध्यक्ष असतील. त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला आहे.
मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून मुंबई जिल्हा बँकेवरचे प्रवीण दरेकरांचे वर्चस्व आता संपुष्ठात आलं आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निवडणुकीची सूत्रं हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँगेसचे सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते मिळाली तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 9 मतं मिळाली आहेत. उपाध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली आहेत.
मुंबई जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संचालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित व्यूहरचना करत भाजपच्या प्रवीण दरेकरांचं वर्चस्व मोडून काढण्याचं ठरलं. त्याच पद्धतीने नियोजन करत आता सिद्धार्थ कांबळेंना अध्यक्षपदी बसवण्यात आलं आहे.
सिद्धार्थ कांबळे हे राष्ट्रवादीचे नेते असून त्यांनीच गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीची कमान सांभाळली आहे. त्यांच्याच कामाचा अनुभव या निवडणुकीत कामाला आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई बँकेचे अध्यक्षपद हे एक वर्षानंतर शिवसेनेला देण्यात येणार आहे.
उपाध्यक्षपदी भाजपचे विठ्ठल भोसले
अध्यक्षपदावर महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी उपाध्यक्षपद भाजपच्या गळ्यात पडलं आहे. उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर आणि भाजपचे विठ्ठल भोसले यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाल्याने चिठ्ठी टाकून उपाध्यक्षपद निवडण्याचं ठरलं. यामध्ये भाजपच्या विठ्ठल भोसले यांनी बाजी मारली.
या निवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, "भाजपकडे 10 मतं होती, विष्णू भुंबरे हे फुटले, त्यामुळे महाविकास आघाडीला 11 मतं मिळाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्य सरकारने दबाव आणला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष लक्ष घातल्याने मोठा दबाव निर्माण केला. सत्तेचा दुरुपयोग करुन ही निवडणूक महाविकास आघाडीने जिंकली."
महत्त्वाच्या बातम्या :