(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai : अंधेरी गिल्बर्ट हिल जलतरण तलाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे ओळखला जाणार; पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा
Andheri Gilbert Hill Swimming Pool : गिल्बर्ट हिल येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेने नव्याने बांधलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाचे आज लोकार्पण करण्यात आलं.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अंधेरी (पश्चिम) स्थित गिलबर्ट हिल येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाला 'छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव' असे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. गिल्बर्ट हिल परिसर हे मुंबईतील पर्यटनाचे आकर्षण ठरेल, या अनुषंगाने परिसराचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही देखील लोढा यांनी दिली.
गिलबर्ट हिल येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचे लोकार्पण मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी, 3 सप्टेंबर रोजी झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्याला राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार अमित साटम, आमदार राजहंस सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतील दहावा जलतरण तलाव यानिमित्ताने नागरिकांच्या सेवेत खुला करण्यात आला आहे. या तलावाच्या सदस्य नोंदणीसाठी आजपासून सुरूवात झाली आहे. 2750 सदस्यांना ऑनलाईन पद्धतीने सदस्यत्वाची नोंदणी करता येणार आहे.
पालकमंत्री लोढा पुढे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कौतुकास्पद काम करताना आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव विकसित केला आहे. अंधेरी परिसरातील नागरिकांसाठी अतिशय उत्तम दर्जाची सुविधा या जलतरण तलावाच्या माध्यमातून मिळेल. तसेच मोकळ्या जागेत याठिकाणी व्यायामशाळेचीही उभारणी करावी, तसेच जलतरण तलावाच्या सभासद नोंदणी महिला वर्गाला अधिकाधिक प्राधान्य मिळावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.
गिल्बर्ट हिल परिसराचा विकास पर्यटनस्थळ म्हणून करावा
दुबईतील सर्वाधिक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून बुर्ज खलिफा ही अतिशय उंच इमारत प्रसिद्ध आहे. मुंबईतील गिल्बर्ट हिल देखील भूवैज्ञानिक वारसा म्हणून अतिशय मोलाचे आहे. या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा. त्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, यातून देश विदेशातील पर्यटक येथे भेट देतील आणि मुंबईचे पर्यटन महत्त्व आणखी वाढेल, असे नमूद करून पुढील वर्षभरात या परिसराला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मुंबईतील झोपडीवासीयांच्या परिसरांमध्ये प्रसाधनगृह सारख्या मूलभूत सुविधांपासून ते दैनंदिन दगदगीतून विसावा मिळण्यासाठी मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्याही निधीची कमतरता पडू देणार नाही. मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
स्थानिक आमदार अमित साटम संबोधित करताना म्हणाले की, गिल्बर्ट हिल येथील गावदेवी मंदिरामध्ये जाण्यासाठी भाविकांना दर्शनाची सुविधा म्हणून याठिकाणी लिफ्टची सुविधा देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच या प्रकल्पाला सुरूवात होईल, असे त्यांनी सांगितले.
मुंबईकरांच्या सेवेत लवकरच आणखी तीन तलाव
मुंबईतील दहावा जलतरण तलाव अंधेरीतील गिल्बर्ट हिल जलतरण तलावाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. आता अंधेरीवासीयांसाठी दोन जलतरण तलाव उपलब्ध झाले आहेत. येत्या महिन्याभराच्या कालावधीत वरळी, विक्रोळी आणि अंधेरी पूर्व (कोंडीविटा) येथे जलतरण तलावाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर काही दिवसातच नागरिकांना त्या ठिकाणी देखील सदस्य नोंदणी ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी संबोधित करताना दिली.
गिल्बर्ट हिल जलतरण तलाव नोंदणी सुविधा
वेळ- सकाळी 6 ते रात्री 10
वार्षिक शुल्क (सर्वसाधारण)– 8 हजार 410 रूपये
महिलांसाठी (25 टक्के सवलत)– 6 हजार 390 रूपये
15 वर्षाखालील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग– 4 हजार 370 रूपये
कालावधी- एका वर्षासाठी 2,750 जणांना सभासदत्व दिले जाणार आहे.
नोंदणी कुठे कराल?
सभासदत्वासाठी रविवारी (दिनांक 3 सप्टेंबर 2023) सकाळी 11 वाजेपासून पासून https://swimmingpool.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी खुली करण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण होवून नंतर सभासदांसाठी हा जलतरण तलाव दिनांक 1 ऑक्टोबर 2023 पासून खुला होईल.
ही बातमी वाचा: