Mumbai Air Quality Index: मुंबईची दिल्ली होतेय का? वर्षभरात 280 दिवस मुंबईची हवा प्रदूषित
एका अहवालात 2022 सालात मुंबईतील 365 दिवसांपैकी 280 प्रदूषणाचे असल्याचे समोर आलेआहे. 2021 च्या तुलनेत 2022 सालात मुंबईच्या सर्व विभागात प्रदूषणाचे आलेख वाढत असल्याचं दिसून येत आहे.
Mumbai Air Quality Index (AQI) : गेल्या वर्षभरात मुंबईच्या हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरल्याचं समोर आलेय. 2022 वर्षात 365 दिवसांपैकी तब्बल 280 दिवस मुंबईतील हवा प्रदूषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या आधारे पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी हा अहवाल समोर आणलाय. मुंबई आणि उपनगरात परिस्थिती काय आहे? आणि काय प्रश्न उद्भवले आहेत?
मुंबई आणि उपनगरात वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वसनाच्या विकारासोबतच इतर त्रासाला देखील सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे, नवी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक मागील ३-४ दिवसांपासून ३३० पार दिसतंय. त्यामुळे अनेकांना श्वसनाचेविकार जडतायत. समोर आलेल्या एका अहवालात 2022 सालात मुंबईतील 365 दिवसांपैकी 280 प्रदूषणाचे असल्याचे समोर आलेआहे. 2021 च्या तुलनेत 2022 सालात मुंबईच्या सर्व विभागात प्रदूषणाचे आलेख वाढत असल्याचं दिसून येत आहे.
मुंबईसोबतच नवी मुंबई, कल्याण आणि ठाण्यातील हवा गुणवत्ता देखील खालावली आहे. मागच्या वर्षीचा विचार केला तरमुंबईचा एक्यूआय शून्य ते 50 मध्ये 40 दिवस बघायला मिळाला तर इतर दिवस तो 50 च्या वरच बघायला मिळाला.
हवेचं प्रदूषण वाढतंय!
2021 च्या तुलनेत 2022 ह्या मागील वर्षातील कल्याण, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील प्रदुषणाची आकडेवारी पाहता मुंबईच्या सर्व विभागात प्रदूषणाचा आलेख वाढत असल्याचे लक्षात येते. मुंबईत प्रदुषणाचे 280 दिवस, कल्याण मध्ये 283, ठाणेमध्ये 276 आणि नवी मुंबईत २५७ दिवस नोंदले गेलेत. एक्यूआय हा सर्व प्रदूषकांची एकत्रित मात्रा असते त्यामुळे वाढते. आकडे अधिक चिंताजनक आहे. मुंबई झालेल्या जी-20 शिखर परिषदेवेळी देखील मुंबईतील एक्यूआय खालावल्यानंतर मोठ्या प्रमाणात उपाययोजनाकरण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर ठोस अशा कोणत्याच उपाययोजना बघायला मिळत नाही. मागील तीन चार दिवसांपासून मुंबईतील हवा गुणवत्ता खालावली आहे. मात्र, यावर ठोस उपाययोजना दिसत नाहीत.
हवा गुणवत्ता खालवली! (सफरच्या नोंदीनुसार)
मुंबई (सरासरी) - 283
नवी मुंबई - 343
अंधेरी - 306
चेंबूर - 329
बीकेसी - 225
बोरिवली - 176
वरळी - 108
माझगाव - 314
मालाड - २१८
कुलाबा - 276
भांडूप - 197
0-50 एक्यूआय हा आरोग्यदायी असतो. 50-100 एक्यूआय प्रदूषित मानला जातो. 100-200 एक्यूआय असल्यास हृदयविकार, दमाविकार असलेल्यांना त्रासदायक असतो. सोबतच लहान मुलं आणि वृद्धांना देखील अपायकारक असतो. 200 च्या वर असल्यास आरोग्यास हानिकारक ठरत असतो. हिवाळ्यात मुंबईतील हवा गुणवत्ता ही खालवत असल्याचं चित्र बघायला मिळतच असतं. मात्र, मागील काही वर्षात याचंप्रमाण वाढलं आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था, सुरु असलेली बांधकामं, मेट्रोची कामं आणि धुळीच्या कणांमुळे यात मोठी भर पडते. अलीकडील प्रदूषणाची स्थिती भयावह आहे. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विविध रोग, दमा, टीबी, केंसर ,सर्दी, खोकला, डोळे, त्वचा, आणि हृदय रोगांचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सरकारकडून तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे.