Mumbai Accident: विसर्जन मिरवणुकीत विजेच्या तारांना स्पर्श झाला, भाईंदरमध्ये तरुणाचा जागेवर मृत्यू, दुसरा तरुण थोडक्यात बचावला
रात्री साडेसात ते पावणे आठच्या सुमारास गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेत असताना प्रतीक शाह यांना वीजेचा धक्का बसला. काही सेकंदांतच त्यांनी प्राण सोडले.

Mumbai Accident: मुंबईतील भाईंदर गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत (Visarjan Miravnuk 2025) शनिवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. भाईंदर पश्चिम येथील मोदी पटेल मार्गावरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता प्रतीक शाह (वय 34) याचा वीजेच्या जोरदार धक्क्याने मृत्यू झाला. गणेशोत्सवाच्या जल्लोषात झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Bhaindar Accident)
सुवर्ण महोत्सवी मिरवणुकीत घडली दुर्घटना
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीसाठी झाडांवर आणि इमारतींवर रोषणाईची सोय करण्यात आली होती. विद्युत केबल्स टाकून प्रकाशयोजना केली गेली होती. रात्री साडेसात ते पावणे आठच्या सुमारास गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेत असताना प्रतीक शाह यांना वीजेचा धक्का बसला. काही सेकंदांतच त्यांनी प्राण सोडले.
दुसऱ्या कार्यकर्त्यालाही बसला शॉक
प्रतीक शाह यांच्यासोबत असलेला दुसरा कार्यकर्ता त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, त्यालाही वीजेचा जोरदार धक्का बसला. सुदैवाने, उपस्थितांनी प्रसंगावधान राखत तातडीने बांबूचा वापर करून त्याला सुरक्षित बाजूला खेचले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु प्रतीक शाह यांना मात्र वाचवता आले नाही.
मृत प्रतीक शाह हे भाईंदर पश्चिमेतील वसंत वैभव इमारतीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील लोकांनीही या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद भाईंदर पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे.
मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू
गणेश विसर्जनाच्या उत्साहात साकीनाका परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. खैराणी रोड परिसरात श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक जात असताना ट्रॉलीला हाय टेन्शन वायरमधून शॉक बसला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. SJ स्टुडिओसमोर खैराणी रोडवर हाय टेन्शन वायरमधून एक छोटी वायर खाली लटकत होती. ही वायर थेट विसर्जन ट्रॉलीला लागल्याने पाच जणांना विद्युत धक्का बसला. जखमींमध्ये बिनू शिवकुमार (वय 36) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तुषार गुप्ता (18), धर्मराज गुप्ता (44), आरुष गुप्ता (12), शंभू कामी (20) आणि करण कानोजिया (14) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.























