मुंबईत घरात घुसून ज्येष्ठ महिलेची निर्घृण हत्या, पावणे सहा लाखांचे दागिने लंपास
मुंबईत एका ज्येष्ठ महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आली. यानंतर मारेकऱ्यांनी तिच्या घरातील पाच लाख 70 हजार रुपयांचे दागिनेही लंपास केले.
मुंबई : मुंबईतील कुर्ल्यात एका ज्येष्ठ महिलेची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. जागृतीनगरमधील अन्वर पवार इमारतीत रविवारी (6 सप्टेंबर) रात्री ही घटना घडली. चोरट्याने 60 वर्षीय महिलेची हत्या करुन पाच लाख 70 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरले.
अन्वर पवार इमारतीमधील रुम नंबर 207 मध्ये जरीना अन्वर शेख या 60 वर्षीय महिला राहत होत्या. त्या आजारी होत्या आणि घरात एकट्याच इथे राहत होत्या. त्यांची मुलगी येऊन-जाऊन त्यांच्या घरी देखभाल करण्यास येत असे. रविवारी मध्यरात्री त्यांच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि त्याने धारधार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करुन त्यांची हत्या केली. घरातील आणि त्यांच्या अंगावरील सर्व दागिने चोरुन तिथून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच नेहरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हत्या आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या आरोपीचा शोध घेत आहे. मात्र या घटनेमुळे आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.