मनसेच्या दणक्यानंतर तृप्ती देवरुखकर प्रकरणाला निर्णायक वळण, सोसायटीने घेतला मोठा निर्णय
शिवसदन सोसायटीचा इंग्रजीतला फलक मराठीप्रेमींच्या सूचनेनंतर बदलण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते राकेश गायकवाड यांनी काल या सोसायटीचा फलक मराठीत करण्यास सांगितला होता
मुंबई : मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर (Trupti Deorukhkar) यांना घर नाकारण्यात आलेल्या शिवसदन सोसायटीचा इंग्रजीतला फलक मराठीप्रेमींच्या सूचनेनंतर बदलण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते राकेश गायकवाड यांनी काल या सोसायटीचा फलक मराठीत करण्यास सांगितला होता, तो आज बदलला आहे. तसेच गुजराती भाषेत या परिसरात असलेल्या फलकांवर त्यानी काळ्या अक्षरात मराठी लिहून निषेध नोंदवला आहे
सामाजिक कार्यकर्ते राकेश गायकवाड म्हणाले, मराठी भाषेसाठी प्रत्येक मराठी माणसाने आवाज उठवला पाहिजे. मुंबईमध्ये जाणून बघून गुजराती भाषेत बोर्ड लावले जातात. त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो. तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने मुलुंडमधील एका इमारतीत ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, जो तुफान व्हायरल झाला. तृप्ती यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसैनिक मुलुंडमधील संबंधित इमारतीत पोहोचले. जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्राला तृप्ती यांची माफी मागायला लावली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क केला. त्यानंतर तृप्ती देवरुखकर यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्याविरोधात कलम 341, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
खासदार मनोज कोटक मिळवून देणार तृप्ती देवरुखकर यांना ऑफिससाठी जागा
मुलुंड मधील मराठी गुजरातीवादानंतर अखेर आता मराठी महिला तृप्ती देवरुखकर यांना त्यांच्या ऑफिससाठीची जागा ईशान्य मुंबई खासदार मनोज कोटक हे मिळवून देत आहेत. तृप्ती देवरुखकर यांना मुलुंड पूर्वेकडील तीन ठिकाणी ऑफिसच्या जागा सुचविण्यात आलेल्या आहेत. खासदार मनोज कोटक आणि महिला कार्यकर्त्या स्वतः तृप्ती देवरुखकर घरी गेल्या होत्या. त्यांनी तृप्ती देवरुखकर यांच्याशी चर्चा करून त्यांच्या गरजेनुसार लागणारी ऑफिससाठीची जागा त्यांनी त्यांना ऑफर केली.यासोबतच तृप्ती सोबत झालेल्या प्रसंगानंतर गृहनिर्माण सोसायटीच्या उपनिबंधकांना खासदार कार्यालयाकडून पत्र देऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
"राजसाहेबांच्या ट्वीटनंतर आम्ही आमच्या स्टाईलमध्ये उत्तर देणार"
दरम्यान, या प्रकरणात मनसे पदाधिकारी सत्यवान दळवी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राज साहेबांच्या ट्वीटनंतर आम्ही आमच्या स्टाईलमध्ये उत्तर देणार असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले की, "काल मनसैनिकांनी पाहिला. ज्यांनी विरोध केला त्यांच्यासमोर आम्ही गेलो आणि त्यांनी माफीसुद्धा मागितली आहे. आता अनेक फोन कॉल येत आहेत आणि त्यांच्यासोबतही अशा गोष्टी घडत असल्याचं सांगत आहेत. आता राज साहेबांच्या ट्वीटनंतर आता आम्ही आमच्या स्टाईलमध्ये उत्तर देणार आहोत. 20 टक्के लोक असे करतात, 8 टक्के लोक चांगले आहेत. जैन समाजासाठी ही जागा आहे हे म्हणणं चुकीचं आहे आणि याबाबत शासनाने पाऊल उचललं पाहिजे.
हे ही वाचा :