(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MPSCचं सुपरफास्ट काम! PSI पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी जाहीर
एमपीएससीनं आता PSI पदांच्या बाबतीत सुपरफास्ट कामगिरी केली आहे.पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणी नंतर चार तासातच निवड यादी जाहीर केली आहे.
MPSC Result: एमपीएससी परीक्षेच्या तारखांच्या लेटलतिफीवरुन गेल्या काही काळात बऱ्याचदा MPSCवर टीका झाल्याचं पाहायला मिळालं. निकालाला होत असलेल्या उशिरावरुन देखील नेहमी विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतात. मात्र एमपीएससीनं आता PSI पदांच्या बाबतीत सुपरफास्ट कामगिरी केली आहे. पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणी नंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या (PSI Exam News) 250 पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील 1031 उमेदवारांची शारीरिक चाचणी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुणे केंद्रावर घेण्यात आली. प्रतिदिन सुमारे 250 उमेदवारांचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पूर्ण करून 2 डिसेंबर रोजी या परीक्षेची तात्पुरती निवड यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या वेबसाईटवर त्वरीत प्रसिद्ध करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील 250 पदांवरील नियुक्तीसाठी 16 एप्रिल 2022 रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेचा निकाल 9 जून 2022 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निकालाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 चे आयोजन 30 जुलै 2022 रोजी करण्यात आले आणि मुख्य परीक्षेचा निकाल 23 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे एकूण 1031 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते.
परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील 'ONLINE FACILITIES' या मेनूमध्ये 'Post Preference / Opting Out' वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक 3 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजेपासून 10 डिसेंबर 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत सुरु राहील. ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब, निवेदने, पत्रव्यवहार त्यानंतर विचारात घेतला जाणार नाहीत, असं आयोगानं म्हटलं आहे.
ही बातमी देखील वाचा