Maharashtra GST: केंद्राकडे महाराष्ट्राची 22 हजार कोटींची जीएसटी थकबाकी; विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका
Maharashtra GST: जीएसटी करातील परतावा म्हणून केंद्राकडून महाराष्ट्राला 22 हजार कोटींहून अधिक थकबाकीची रक्कम येणे राहिले आहे.
Maharashtra GST: केंद्र सरकारला सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून मिळत असला तरी जीएसटी (GST Revenue) करातील थकबाकी दिली जात नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात असताना दुसरीकडे मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राची तब्बल 22 हजार 794 कोटींची जीएसटीची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. थकबाकी मिळत नसल्याने विकासकामांवर परिणाम होत असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. त्यावेळी भाजप नेत्यांकडून हा कांगावा असल्याचे सांगत पलटवार करण्यात येत होता. मात्र, समोर आलेल्या आकडेवारीनुसार मागील तीन वर्षांपासून केंद्र सरकारकडून जीएसटी परतावा दिला नसल्याचे समोर आले आहे.
आर्थिक वर्ष 2019-20 ची 1 हजार 29 कोटी रुपये, वर्ष 2020-2021 ची 6 हजार 470 कोटी रुपये आणि 2021-2022 ची 8 हजार 2 कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडून येणे शिल्लक आहे. तर, सध्या सुरू असलेले आर्थिक वर्ष 2022-23 मधील 7 हजार 293 कोटींची थकबाकी आहे. वर्ष 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षांचे CAG Audit Certification प्राप्त झाले आहे.
राज्य सरकार उदासीन?
केंद्राकडून राज्याच्या हक्काची रक्कम मिळवण्यासाठी राज्य सरकार उदासीन आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात राज्य सरकर कमी पडत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. थकबाकीची रक्कम मिळत नसल्याने विकासकामांवर परिणाम होतं असल्याचा विरोधकांनी दावा केला आहे.
महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी
सप्टेंबर महिन्यात एक लाख 47 हजार 686 कोटींचे करसंकलन झाले. सलग सात महिन्यांमध्ये 1.40 लाख कोटींहून अधिक जीएसटी करसंकलन झाले आहे. महाराष्ट्रातून सप्टेंबर 2022 मध्ये 21 हजार 403 कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला. मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत 29 टक्के अधिक जीएसटी जमा झाला.