मोदी सरकारमधील मंत्र्याचे परदेशी आणि देशातंर्गत प्रवासावर 393 कोटी खर्च
कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या खर्चाचा समावेश आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदीसह कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नाही.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी मागील 5 वर्षात मोठ्या प्रमाणात परदेशी आणि देशातंर्गत प्रवास केला. या प्रवासावर एकूण 393 कोटी 57 लाख 51 हजार 890 रुपये खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खाते विभागाने दिली. सर्वाधिक खर्च परदेशी प्रवासांवर झाला असून त्यावर झालेल्या एकूण खर्चाची रक्कम 292 कोटी आहे, तर देशातंर्गत प्रवासांवर 110 कोटी खर्च झाला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या गेल्या 5 वर्षातील परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या एकूण खर्चाची माहिती मागितली होती. कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खाते विभागाचे वरिष्ठ लेखा अधिकारी सतीश गोयल यांनी अनिल गलगली यांना ई-लेखाच्या आधारावर त्या कार्यालयाच्या अभिलेखावर उपलब्ध वर्ष 2014-2015 पासून वर्ष 2018-2019 या 5 वर्षात परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या एकूण खर्चाची आकडेवारी दिली.
यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या खर्चाचा समावेश आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदीसह कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नाही. गेल्या 5 वर्षात कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर एकूण 262 कोटी 83 लाख 10 हजार 685 रुपये खर्च झाला आहे, तर देशातंर्गत प्रवासांवर एकूण 48 कोटी 53 लाख 9 हजार 584 रुपये खर्च झाले. राज्यमंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर 29 कोटी 12 लाख 5 हजार 170 रुपये खर्च झाले, तर देशातंर्गत प्रवासांवर 53 कोटी 9 लाख 26 हजार 451 रुपये खर्च झाले आहेत.
वर्ष 2014-2015 मधील प्रवास खर्च कॅबिनेट मंत्र्यांच्या वर्ष 2014- 15 मधील परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर 98 कोटी 48 लाख 62 हजार 352 रुपये खर्च झाले आहेत. तर राज्यमंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर 11 कोटी 28 लाख 81 हजार 439 रुपये खर्च झाले आहेत.
वर्ष 2015-2016 मधील प्रवास खर्च वर्ष 2015-2016 मध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर 84 कोटी 99 लाख 87 हजार 624 रुपये खर्च झाले आहे, तर राज्यमंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर 13 कोटी 17 लाख 41 हजार 407 रुपये खर्च झाले आहेत.
वर्ष 2016-2017 मधील प्रवास खर्च वर्ष 2016- 2017 मध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर 45 कोटी 51 लाख 72 हजार 825 रुपये खर्च केले आहे तर राज्यमंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर 12 कोटी 11 लाख 21 हजार 832 रुपये खर्च करण्यात आले आहे.
वर्ष 2017-2018 मधील प्रवास खर्च वर्ष 2017- 2018 मध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर 33 कोटी 85 लाख 97 हजार 483 रुपये खर्च झाले आहे तर राज्यमंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर 17 कोटी 79 लाख 87 हजार 199 रुपये खर्च करण्यात आले आहे.
वर्ष 2018-2019 मधील प्रवास खर्च वर्ष 2018- 2019 मध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर 48 कोटी 49 लाख 99 हजार 985 रुपये खर्च झाले आहे तर राज्यमंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर 27 कोटी 83 लाख 99 हजार 744 रुपये खर्च करण्यात आले आहे.
अनिल गलगली यांच्या मते परदेश आणि देशातंर्गत प्रवास मोठ्या प्रमाणात झाला असून एकूण खर्चाची माहिती अभिलेखावर आहे. मात्र कोणत्या मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी किती प्रवास केला आहे, याचे विवरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. याचे विवरण केंद्र शासनाने सार्वजनिक केले पाहिजे.