(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर
Sandeep Deshpande Santosh Dhuri : मनसे नेते संदीप देशपांडे, आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा दिला आहे. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या आरोपाखाली दोघांवरही गुन्हा दाखल होता.
Sandeep Deshpande Santosh Dhuri : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी (Santosh Dhuri) यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा दिला आहे. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या आरोपाखाली दोघांवरही गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात दोघांनाही सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या सोबतच संदीप देशपांडेंचा चालक आणि मनसेचे शाखाध्यक्ष संतोष साळी यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर 17 मे रोजी सुनावणी पार पडली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद न्यायालयानं ऐकून घेतला आणि निर्णय राखून ठेवला होता. आज संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना कोर्टानं दिलासा दिला आहे.
मागील सुनावणीत काय घडलं?
17 मे रोजी सुनावणीत संदीप देशपांडेच्या जामीन अर्जला राज्य सरकारकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. तसेच, सरकारतर्फे जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात आलं होतं. जामीन दिल्यास पोलीस तपासावर परिणाम होऊ शकतो. ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते दोघेही राजकीय नेते आहेत, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वकिलांकडून करण्यात आला होता.
राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तीवाद
राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही युक्तीवाद केला होता. "संदीप देशपांडे आणि इतर नेते मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरातून जेव्हा बाहेर आले, तेव्हा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी त्यांना बाजूला नेलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलून येतो, असं सांगितलं. मात्र दोघांचा इरादा वेगळाच होता. माध्यमांशी बोलण्याचा केवळ बनाव त्यांनी केला. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोघेही चालत्या गाडीत बसून पळून गेले. जर ते सुजाण नागरीक आणि कायद्याचा पालन करणारे असते तर त्यांनी पोलिसांना सहकार्य केलं असतं", असं सरकारी वकील प्रदिप घरत यांनी बोलताना सांगितलं. पुढे बोलताना, "या घटनेमध्ये रोहिणी माळी या महिला पोलीस कर्मचारी यांना दरवाजा लागला. त्या खाली पडल्या. त्यांना खांद्याला आणि पाठीला मार लागला, पण तो गंभीर नव्हता. गाडी चालकानं गाडीही जलदगतीनं चालवली, असा आरोप आहे. चालकानं गाडीचा दरवाजा उघडा आहे, हे न पाहताच गाडी चालवली. त्या ठिकाणी तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी झालेल्या पळापळीत महिला पोलीस जखमी झाली. संतोष धुरी यांना ताब्यात घेताना चालकानं गाडी चालवली. यावेळी गाडीचे एक चाक पोलीस अधिकाऱ्याच्या पायावरून गेलं. त्यामुळे पकडही सैल झाली. तसेच धावत्या गाडीचा उघडा दरवाजा महिलेला लागला आणि ती जमिनीवर कोसळली. या अपघातात महिलेच्या पाठीलाही जखम झाली. मात्र काही अंतरावर आरोपींनी गाडी बदलीकरून ते नवी मु़ंबईच्या दिशेने गेले.", अशी माहिती घरत यांनी मु़ंबई सत्र न्यायालयात दिली होती.
प्रकरण नेमकं काय?
मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं सांगितलं. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचं पोलिसांना सांगितलं. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी गाडीत बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण गाडी न थांबवताच ते तिथून निघून गेले. त्यांची गाडी भरधाव वेगानं जात असताना एक महिला पोलीस जखमी झाली. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खरं. पण पोलिसांनी याप्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत. एवढंच नाहीतर संदीप देशपांडेंना शोधण्यासाठी पोलीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरही पोहोचले होते.