राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया, काही दिवसांपूर्वी झालेली दुखापत
राज ठाकरे यांच्या पायावर लीलावती रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राज ठाकरे यांना ही दुखापत टेनिस खेळताना झाली असल्याची माहिती आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज लीलावती रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया झाली. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांना टेनिस खेळताना हातासोबतच पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे पायाच्या मसल टिशूमध्ये रक्त जमा झालं होतं. त्यामुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी हॅमेटोमा ड्रेनेजची छोटी शस्त्रक्रिया केली गेली. डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली आज सकाळी त्यांना दाखल करण्यात आले आणि दुपारी 3 वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. डॉ. विनोद अग्रवाल, डॉ आनंद उत्तुरे यांनी ही शस्त्रक्रिया केली आणि डॉ जलील पारकर देखील शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांना एक ते दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी आणि सून मिताली हे देखील उपस्थित होते..
11 जानेवारी 2021 रोजी राज ठाकरे यांच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टरांनी त्यांना पुढील दीड महिना हाताला प्लास्टर ठेवण्यासाठी सांगितलं होतं. राज ठाकरे यांना ही दुखापत टेनिस खेळताना झाली होती. त्या वेळी त्यांच्या हाता सोबतच पायालाही दुखापत झाली, ज्याचा त्रास राज ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी जाणवला.
दरम्यान मागील काही महिन्यांपासून राज ठाकरे दररोज सायंकाळी शिवाजी पार्क येथील टेनिस क्लबमध्ये टेनिस खेळण्यासाठी येत असतात. त्यावेळी त्यांच्यासोबत टेनिस खेळण्यासाठी त्यांनी आदित्य नावाच्या एका कोचची देखील नियुक्ती केल्याची माहिती आहे. दररोज संध्याकाळी शिवजीपार्क येथील जिमखाना येथे तास दोन तास टेनिस खेळणे, पहाटे साडेपाच वाजता लवकर उठून एक तास योगासने करणे. त्यानंतर बॉडी स्ट्रेचिंग करणे असा दिनक्रम राज ठाकरे करत असल्याची माहिती आहे. यासोबतच वजन कमी करण्यासाठी त्यांनी संकेत कुलकर्णी नावाच्या एका प्रशिक्षकाची देखील नेमणूक केली असून संकेत हे राज ठाकरे यांना वजन कमी करण्यासाठीचा डाएट कसा असावा याबाबत मार्गदर्शन करत आहेत. यासाठी त्यांनी आठवड्यातील काही वार देखील ठरवून घेतले आहेत. मागील जवळपास एक वर्षांपासून राज ठाकरे यांनी टेनिस खेळणं सुरू केलं आहे. याचा चांगलाच फायदा राज ठाकरे यांना होत असल्याची देखील माहिती आहे. यासोबतच राज ठाकरेंनी घरीच जीम तयार केली असून दररोज व्यायाम करून घेण्यासाठी एका ट्रेनरची देखील नेमणूक केली आहे. दररोज सकाळी योगासने करणे, जीममध्ये व्यायाम करणे, संध्याकाळी टेनिस खेळणे यासोबतच ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळी ते पोहण्याचा देखील आनंद घेतं असतात.