मीरा भाईंदरची परिवहन सेवा उद्यापासून सुरु होणार
मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेच्या निर्णयाला स्थगिती देत. बस सेवा त्वरित सुरु करण्याचे आदेशच दिले. यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, आज आयुक्तांच्या दालनात बैठक बोलवण्यात आली.

मीरा-भाईंदर : मीरा भाईंदरकरांसाठी आता एक आनंदाची बातमी. उद्यापासून मीरा भाईंदर पालिकेची परिवहन सेवा सुरु होणार आहे. आज आयुक्तांच्या दालनात परिवहन कर्मचारी, त्यांच्या संघटनेचे नेते, परिवहनचे ठेकेदार, पोलीस आणि आयुक्तासोबत बैठक झाली यात सकारात्मक चर्चा होऊन, उद्यापासून परिवहन सेवा सुरु होण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. परिवहन बस सेवा त्वरित सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.
ऐन कोरोनाच्या संक्रमण काळात मीरा भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा बंद होती. त्यामुळे मीरा भाईंदरकारांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागतं होतं. त्यात परिवहन कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून पगार न मिळाल्याने त्यांनीही आंदोलन सुरु केलं होतं. त्यात अनेक राजकीय हस्तक्षेप झाल्याने सेवा सुरु होण्याची रखडली. दरम्यान आयुक्तांनी अखेर कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवत, परिवहन ठेकेदाराचा ठेकाच बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावर ठेकेदाराने या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली.
मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेच्या निर्णयाला स्थगिती देत. बस सेवा त्वरित सुरु करण्याचे आदेशच दिले. यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, आज आयुक्तांच्या दालनात बैठक बोलवण्यात आली. यात आयुक्तांसह, पोलीस विभागाचे अधिकारी, परिवहन कामगार, त्या संघटनेचे प्रतिनिधी, ठेकेदार यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणून, उद्यापासून परिवहन सेवा सुरु करण्यात एकमत झालं. त्यामुळे घटस्थापनेच्या शुभमुहुर्तावर मीरा भाईंदरची परिवहन सेवा सुरु होणार आहे.























