बस स्टॉपला चक्क बांगलादेशचं नाव, मीरा भाईंदर पालिकेचा पराक्रम
Mira Bhaindar Municipal Corporation : मुंबई जवळील मीरा भाईंदर शहरात एका परिसरातील बस थांब्याला चक्क बांगलादेश असं नाव दिलेय.
Mira Bhaindar Municipal Corporation : मुंबई जवळील मीरा भाईंदर शहरात एका परिसरातील बस थांब्याला चक्क बांगलादेश असं नाव दिलेय. त्यामुळे खळबळ उडाली आहे. भाईंदर पश्चिम येथील उत्तन-चौक भागात पालिकेने असा हा प्रताप केला आहे. पूर्वी परराज्यातून आलेले विस्थापित नागरिक येथे राहत असल्यामुळे बांग्लादेश असे टोपण नाव या परिसराला पडले होते. मात्र आता पालिकेने परिवहन बस थांब्यावर नाव टाकल्याने येथील नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.
जर तुम्हाला बांगलादेशात जायचं असेल तर आता भाईंदर पश्चिमेकडून उत्तन येथे जाणारी मीरा भाईंदर महानगरपालिकेची बस पकडावी लागेल. आणि अर्धा तासात आपण बांगलादेशाला पोहचाल. मुंबई जवळच्या मिरा भाईंदर महानगरपालिकेने आपल्या एका परिसराच्या बस थांब्याला बांगलादेश असं नाव दिलं आहे. पालिकेच्या अतीहुशार आणि कामात प्रामाणिक असणा-या अधिका-यांनी हा प्रताप केल्याने येथील नागरीक कमालीचे संतापले आहेत.
भाईंदर पश्चिमेला उत्तन हा समुद्र किनाऱ्या लगतचा परिसर आहे. या ठिकाणी मच्छिमार कोळीबांधवांची गावे अधिक प्रमाणात आहे.पूर्वीपासूनच या किनाऱ्यावर मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे, येथे मासेमारीसाठी खलासी मजूरांची गरज भासत होती. खलासी मजूर पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणात आले होते. भाईंदरच्या पाली-चौक येथे ही वस्ती अधिक होती. यांची भाषा ही बंगाली असल्याने या ठिकाणाला बांग्लादेश वस्ती असं संबोधू लागले आणि ही बोली भाषा प्रचलित झाली.
इंदिरा गांधीच्या पुढाकारामुळे 'बांगलादेश' राज्याची निर्मिती झाली होती. आणि त्यामुळे या बांगलादेश वसाहतीला इंदिरा नगर हे नाव दिलं गेलं होतं. माञ दुर्दैवाने बांग्लादेश हे नाव प्रचलीत झालं होतं. आणि ते येथील नागरीकांच्या आधार कार्ड, लाईट बिल आणि पालिकेच्या घरपट्टीवर ही बांग्लादेश असं नाव लिहलं गेलं. आणि सर्वात मोठं म्हणजे मिरा भाईँदर महानगरपालिकेच्या अधिका-यांनी यावर लक्ष दिलचं नाही. यावर पालिकेचा कहर म्हणजे चक्क या परिसरातील बस थांब्यालाच बांग्लादेश असं नाव दिलं. त्यामुळे आम्ही भारतीय असताना देखील लोकांच्या उच्चारामध्ये बांगलादेशी अशी हाक मारली जात असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण पसरलं आहे. प्रशासनाने याची लवकर दखल घेऊन हे नाव बदलावे अशी मागणी स्थानिक नागरीक करु लागले आहेत.
आणखी वाचा :
Baramati : फडणवीस म्हणतात मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीने अडवले, अजित पवारांनीही दिले उत्तर