पब्जी खेळण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलाकडून मोठ्या भावाची हत्या, भिवंडीतील धक्कादायक घटना
पब्जी गेम खेळू न दिल्याने चिडलेल्या फहादने घरातील कात्रीच्या साह्याने हुसैनच्या पोटावर आणि छातीवर सपासप वार केले. यामध्ये हुसैनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
भिवंडी : पब्जी गेम खेळण्यास मनाई केल्याने लहान भावाने मोठ्या भावाची कात्रीने भोसकून हत्या केल्याचा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. मोहम्मद हुसैन (19) असं मृत तरुणाचं नाव आहे. या हत्येप्रकरणी अल्पवयीन मोहम्मद फहादला शांतीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
भिवंडीतील चौहान कॉलनीजवळील चाळीतील आपल्या घरी मोहम्मद फहाद आईच्या मोबाईलवर ऑनलाईन पब्जी गेम खेळत होता. त्यावेळी मोठा भाऊ मोहम्मद हुसैनने त्याला मोबाईलवर गेम खेळण्यास मनाई केली आणि त्याच्याजवळील मोबाईल हिसकावून घेतला.
आपल्याला गेम खेळू दिला नाही या रागातून फहादने मोठ्या भावासोबत भांडण सुरु केलं. भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यावेळी चिडलेल्या फहादने घरातील कात्रीच्या साह्याने हुसैनच्या पोटावर आणि छातीवर सपासप वार केले.
या हल्ल्यात हुसैन गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला जवळील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि हत्या करणाऱ्या मोहम्मद फहादला ताब्यात घेतलं. पंचनामा करुन पोलिसांनी फहादविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.