एक्स्प्लोर
‘मी अगेन्स्ट दी मुंबई अंडरवर्ल्ड’, इसाक बागवान यांच्या पुस्तकाचं प्रकाशन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याहस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं.

मुंबई : मुंबई पोलीस दलातले वरिष्ठ निवृत्त अधिकारी इसाक बागवान यांच्या ‘मी अगेन्स्ट दी मुंबई अंडरवर्ल्ड’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याहस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर झेंडे, आयपीएस अधिकारी कैसर खालिद, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, क्राईम नोव्हेलस्ट हुसेन झैदी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. उद्धव ठाकरेंचा इसाक बागवान यांच्या कारकीर्दीला सलाम दरम्यान, इसाक बागवान आणि मुंबई पोलीस दलाच्या शौर्याला मानाचा मुजरा करायला आपण या कार्यक्रमात आलो असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 56 इंचाच्या छातीपेक्षा त्यावर शौर्य पदकं किती हे महत्त्वाचं आहे, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. बागवान याचं आयुष्य उघड्या पुस्तकासारखं आहे. चांगले पोलीस आणि निष्णात वकील नसतील तर गुन्हेगार फासाचे दोर कापून पळून जातील. पोलीस जनतेचा पालक असतो, पण पोलिसांच्या कुटुंबाची काळजी कोण घेतं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. 1992/93 चा आगडोंब सर्वांनी पाहिलाय. समोरून हल्ला सुरु असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश येतात सिच्युएशन टॅक्टफुली हँडल करा. टॅक्टफुली याला अर्थ नसतो. एखादाच बागवान नावाचा अधिकारी असतो जो कोर्टात हल्ला झाला असता मागचा पुढचा विचार न करता शौर्य दाखवतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बागवान यांच्या कारकीर्दीचं कौतुकही केलं. गुंडांना रिटायरमेंट नाही. दाऊदचे वय काय आहे माहित नाही. मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाचा झेंडा या पुस्तकाने जगभर फडकेल याचा अभिमान आहे. पोलीस दल आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. सरकार गेलं खड्ड्यात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, खरे हिरो आहेत त्यांच्यावर चित्रपट आले पाहिजेत, असं मतही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं. उज्ज्वल निकम यांचा संजू सिनेमावर निशाणा शूट आऊट अॅट वडाळा या चित्रपटात वस्तूस्थितीशी फारकत दाखवली म्हणून त्या चित्रपटात इसाक बागवान यांनी आपला उल्लेख करू नये अशी कणखर भूमिका घेतली. हल्ली जे सिनेमा निघत आहेत, त्यात गुन्हेगारीचं उदात्तीकरण होत आहे. खरी वस्तूस्थिती लपवली जात आहे, असं म्हणत उज्ज्वल निकम यांनी अभिनेता संजय दत्तचा बायोपिक संजू सिनेमावर नाव न घेता निशाणा साधला. आपल्याला पुस्तकाचा फायदा होईल : नवाजुद्दीन सिद्दीकी मी गँगस्टर आणि पोलीस असे दोन्ही रोल केले आहेत. रईस चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. बागवान यांचं हे पुस्तक थोडं आधी आलं असतं तर मला त्या भूमिकेसाठी त्याचा निश्चित फायदा झाला असता. पण पुढील भूमिकांसाठी मला हे पुस्तक उपयोगी पडेल, असं नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला. ‘तेव्हा’ बागवान यांनी ‘मिशन भुजबळ’ फेल केलं होतं : संजय राऊत या पुस्तकाने मुंबई पोलीस दलाला जागतिक नकाशावर नेऊन ठेवण्याचं काम केलं आहे. 56 इंचाची छाती काय असते ते कुणी इसाक बागवान यांच्याकडून शिकावं, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला. बारामती हे दोन लोकांमुळे ओळखलं गेलं. शरद पवार आणि इसाक बगावन. पण पवार यांच्या आधी बागवान यांनी कोर्टात शौर्य दाखवून दिल्लीला बारामतीची पहिली ओळख पटवून दिली. बागवान यांचे राजकीय नेत्यांशी स्नेहपूर्ण संबंध होते, पण त्याचा त्यांनी कधीही गैरफायदा उचलला नाही, असंही संजय राऊत म्हणाले. शिवसैनिकांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्ला केला होता. पण इसाक बागवान यांनी त्यावेळी आमचं 'मिशन भुजबळ' फेल केलं होतं, अशी आठवणही संजय राऊत यांनी करुन दिली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















