कल्याणमध्ये मटकाकिंग जिग्नेश ठक्करची बालपणीच्या मित्राकडूनच हत्या
जिग्नेश हा शुक्रवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील नीलम गेस्ट हाऊस गल्लीतल्या त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता. तिथून तो निघताच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
कल्याण : मटका किंग जिग्नेश ठक्कर याची शुक्रवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या जिग्नेशचा बालपणीपासूनचा मित्र असलेल्या गँगस्टर धर्मेश उर्फ नन्नू शाह यानेच केल्याचं समोर आलं आहे. जिग्नेश हा शुक्रवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील नीलम गेस्ट हाऊस गल्लीतल्या त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता. तिथून तो निघताच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार हा गोळीबार धर्मेश उर्फ नन्नू शहा आणि जयपाल उर्फ जपान केला. यापैकी धर्मेश हा गँगस्टर असून तो मृत जिग्नेशचा बालपणीपासूनचा मित्र होता. धर्मेश आणि जिग्नेश हे दोघेही आधी एकत्रितपणे गुन्हेगारी टोळीत सक्रिय होते, तसेच त्यांच्यावर यापूर्वी अनेक केसेस दाखल आहेत. मात्र या दोघांमध्ये असलेल्या आर्थिक देवाणघेवाणीमुळे त्यांच्यात वाद झाले आणि त्यातून धर्मेशनं हे टोकाचं पाऊल उचललं.
धर्मेश आणि त्याच्या साथीदाराने जिग्नेशवर पाच गोळ्या झाडल्या त्यापैकी चार गोळ्या जिग्नेशच्या छातीत लागल्या. हा प्रकार घडला त्यावेळी तिथे इतरही लोक होते, मात्र कुणी मध्ये आल्यास गोळ्या घालण्याची धमकी धर्मेशनं दिल्याचं प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं. गोळीबार करून धर्मेश निघून गेल्यावर जिग्नेशला तातडीने कल्याणच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. या सगळ्या प्रकरणात धर्मेश शहाचं नाव आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी ५ पथकं रवाना केली असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी व्यक्त केला आहे.