रात्र शाळांसाठी मासूम संस्थेचा पुढाकार, 85 शाळेतील शिक्षकांना देणारं डिजिटल शिक्षण
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मासूम या संस्थेने रात्र शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या या महाभयंकर कालावधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. नुकतच सरकारने ऑनलाईन शिक्षणासाठी प्रयत्न देखील सुरु केले आहेत. मात्र रात्रशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत थोडं दुर्लक्ष झाल्याचं समोर आलं होतं. ही बाब लक्षात घेत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मासूम या संस्थेने रात्र शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी पुढाकार घेतला आहे.
मासूम संस्थेच्या वतीने राज्यातील 85 शाळांतील 300 शिक्षकांना डिजिटल माध्यमांचा वापर करून शिकवायचं कसं याचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. यासाठी एक ऑनलाईन प्रोग्राम देखील बनवण्यात आला आहे. या माध्यमातून आता शिक्षकांना दिवसांतील ठराविक कालावधीत डिजिटल माध्यमांचं शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांच्या बॅच तयार करण्यात आल्या असून मासूमचे 30 शिक्षक याचं काम पाहणार आहेत. मासूमच्या या उपक्रमाचा तब्बल राज्यातील 5 हजार रात्र शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मासूमने मुंबईतील रात्रशाळांतील विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं होतं. यासाठी मासूमकडून झोपडपट्टीत राहणाऱ्या 400 विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन देखील देण्यात आले होते.
याबाबत बोलताना मासूमच्या संचालिका निकिता केतकर म्हणाल्या की, सध्या हा उपक्रम शिक्षकांसाठी सुरु आहे. यापुढे जाऊन मासूम राज्यभरातील रात्रशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देणारं आहे. यासाठी मासूमला स्मार्ट फोनची गरज आहे. ही बाब लक्षात घेत समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी. राज्यभरात तब्बल 5 हजार मुलं रात्रशाळांमध्ये शिकतात. यामध्ये बहुतेक मुलं ही दिवसा काम करून रात्री शाळेत येतात. यातील बहुतेक मुलं ही झोपडपट्टीत राहणारी आहेत. ज्या मुलांचे राहण्याचे आणि खाण्याचे हाल आहेत. ती मुलं ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन घ्यायला 5 ते 10 हजार रुपये कुठून आणणार? त्यामुळे मासूमने या मुलांसाठी स्मार्ट फोन देण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.
आत्तापर्यंत 400 स्मार्ट फोन संस्थेकडे आले आहेत. परंतू विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तीनी गरजू मुलांसाठी संस्थेला मदत करावी. यासाठी संस्थेकडून +919967133001 हा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. मासूमच्या शिक्षकांना डिजिटल ट्रेनिंग देण्याच्या या उपक्रमात मुंबई, नागपूर, अहमदनगर आणि पुण्याच्या शाळांनी सहभाग घेतला आहे. गणित, विज्ञान, इंग्रजी आणि मराठी या विषयांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी ' मायकल अँड डेल सुजन' फाऊंडेशनने आम्हांला मदत केली आहे. आम्ही या उपक्रमाची व्याप्ती आणखी मोठय़ा प्रमाणात वाढवत आहोत. सध्या नागपूर महापालिकेशी देखील आमचं बोलणं सुरु आहे. जर महापालिकेकडून आम्हांला सर्व परवानगी मिळाल्या तर निश्चितच नागपूरमधील 29 शाळांमध्ये देखील हा उपक्रम सुरु होईल. यासोबत आमचं राज्य शासनाकडे देखील आशा प्रकारच्या उपक्रमासाठी प्रयत्न सुरु आहेत. जर राज्यशासनाने परवानगी दिली तर डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत होईल.
संबंधित बातम्या :
जिओचे इयत्ता तिसरी ते बारावीसाठी 4 माध्यमांमध्ये जिओ टीव्हीवर 12 शैक्षणिक चॅनेल सुरू
ऑनलाईन शिक्षणाचा 'व्हीस्कूल पॅटर्न', महाराष्ट्रातील दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
व्हॉट्सअॅपच्या एका फॉरवर्डमधून हर्षल आंतरराष्ट्रीय स्तरावर, कलेच्या माध्यमातून परिवाराला आर्थिक मदत