एक्स्प्लोर
मराठा आरक्षण: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत.
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेना आमदारांची दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी होईल.
काँग्रेसनंही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरु आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसची बैठक विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी होणार आहे.
मुख्यमंत्र्यांचं आवाहन
सरकार सर्वांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करेल. त्यामुळे या आणि सरकारशी चर्चा करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदनंतर रविवारी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलकांमध्ये बंद दाराआड मुंबईत चर्चा पार पडली. मात्र, या बैठकीत सहभागी झालेले आंदोलक नेमके कोण आहेत, याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेचे नेते आणि खासदार नारायण राणे आणि काँग्रेस आमदार नितेश राणे हे पिता-पुत्र देखील उपस्थित होते.
..त्यांच्याशी आमचा संबंध नाही
दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सहभागी झालेल्यांचा आणि मराठा समाजाचा काही संबंध नसल्याचंही लातूरच्या मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केलं आहे. लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांची राज्यस्तरीय बैठक काल पार पडली. यावेळी 9 ऑगस्टला क्रांतीदिनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. राज्यातील प्रत्येक गावच्या वेशीवर समाज बांधव गुराढोरासह ठिय्या देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याचबरोबर राज्यातील सर्व मराठा आमदार आणि खासदारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलक करणार असल्याचं मराठा आंदोलकांनी जाहीर केलंय.
आज सोलापूर बंद
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमधून सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, शिक्षणसंस्था आणि बाजारसमित्या या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. बंद दरम्यान कोणत्याही प्रकारची हिंसा न करण्याचं आवाहन समन्वयकांकडून करण्यात आलं आहे.
परळीतील ठिय्या आंदोलनाचा 13 वा दिवस
परळीत सुरु असलेल्या मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाचा आज 13 वा दिवस आहे. काल विभागीय आयुक्तांसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानं आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा मोर्चा समन्वयकांनी दिला आहे.
सरकारच्यावतीनं विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन सरकारची बाजू मांडली. यानंतर समन्वय समितीने स्वतंत्र चर्चा केली. बराच वेळ विचार विनिमय झाल्यानंतर सरकारकडून दिलेली आश्वासनं मान्य नसल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.
खूश करण्याचा प्रश्नच नाही: शरद पवार
घटनादुरुस्तीतून समाजाला खूश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी भारिपचे प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर दिली आहे. मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा, त्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी मी उचलेन, असा सल्ला पवारांनी सरकारला दिला आहे. त्यावर घटनादुरुस्ती नेमकी कशी होईल, हे पवारांनी स्पष्ट करावं, असं मत भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं.
संबंधित बातम्या
सरकारशी चर्चा करणाऱ्या समन्वयकांशी समाजाचा संबंध नाही : मराठा मोर्चा
घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच नाही : पवार
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार : मुख्यमंत्री निवेदन घेऊन विभागीय आयुक्त परळीतील मोर्चेकऱ्यांच्या भेटीला मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार : मुख्यमंत्रीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement