Maratha Protest Mumbai: मराठा आंदोलन संपलं, पण भाकऱ्या अन् पाण्याच्या बाटल्यांची प्रचंड रास उरली, आंदोलकांनी काय केलं?
Maratha Protest Mumbai: तीन दिवसांत 10 लाख भाकरी जमा झाल्या. चटणी, ठेच्यासह अत्यावश्यक साहित्यही जमा झाले होते, काल (मंगळवारी) सिडको प्रदर्शन केंद्रात या सर्व साहित्याची रास लागली होती.

मुंबई : मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून चटणी-भाकरीची शिदोरी नवी मुंबईत आली होती. ट्रकच्या ट्रक भरून शिदोरी पाठवण्यात आली होती. तीन दिवसांत 10 लाख भाकरी जमा झाल्या. चटणी, ठेच्यासह अत्यावश्यक साहित्यही जमा झाले होते, काल (मंगळवारी) सिडको प्रदर्शन केंद्रात या सर्व साहित्याची रास लागली होती. त्यानंतर अखेर मदत थांबवा असं, आवाहन करावं लागलं होतं.
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर
मराठा आंदोलक मुंबईत धडकले आणि आंदोलनाला सुरूवात झाली तेव्हा आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मुंबईतील हॉटेल बंद ठेवली. पाणी कमी पडत असल्याचं राज्यभरात समजलं अन् प्रत्येक गावातून 'एक शिदोरी आंदोलकांसाठी' असं अभियान सुरू झालं. प्रत्येक गावातून भाकरी, चपाती, ठेचा, लोणचे, भाजी, पाणी व इतर साहित्य पाठवण्यास सुरुवात झाली. मदतीचा ओघ इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढला की वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात चार ठिकाणी भाकरी व इतर साहित्य ठेवावे लागले. भाकरी वेगळ्या करून ठेवल्या जात आहेत. खराब होणारी भाजी तत्काळ वेगळी केली जात आहे. आलेले अन्न तत्काळ आंदोलकांना देण्याचे प्रयत्न केले जात होते. आंदोलकांनीही यासाठी स्वयंसेवकांची मोठी भूमिका बजावली. आंदोलन सुरू झाल्यापासून जवळपास दहा लाख भाकरी नवी मुंबईत पाठवण्यात आल्या. संपूर्ण शहराला जेवण देता येईल, एवढे साहित्य उपलब्ध झाले. अखेर काल (मंगळवारी) मराठा समाजाने भाकरी खूप झाल्या आहेत आता मदत थांबवावी, असे आवाहन करण्यात आले.
उरलेल्या हजारो भाकऱ्या, पाण्याच्या बाटल्या वाटल्या
मराठा आंदोलनात सहभागी झालेल्यांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाकऱ्या, ठेचा, चटणी, लोणचे व पाण्याच्या बाटल्या मुंबईत पाठवण्यात आल्या होत्या. मंगळवारी सायंकाळी आंदोलन संपल्याने या उरलेल्या भाकऱ्या, चटणी, लोणचे आदी अन्नपदार्थ व पाण्याच्या बाटल्या मुंबईतील गरजू रुग्ण, अनाथ आश्रमातील मुले यांना देण्याचा निर्णय मराठा आंदोलकांनी घेतला. रात्री उशिरापर्यंत अन्न व पाणी योग्य व गरजूंपर्यंत पोहोचेल यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रुग्णालये व अनाथाश्रमात दान
गावातील सामान्य नागरिकांनी कुवतीप्रमाणे वर्गणी काढून हे अन्न, पाणी मुंबईत पाठवले आहे. त्यामुळे ते वाया जाणार नाही याची काळजी घेतल्याची माहिती दिली. भाकरी, पोळी, चुरमुरे, फरसाण, चिवडा, पाण्याची बाटली, ठेचा, खर्डा, लोणचे व इतर पदार्थ मोठ्या प्रमाणात राहिल्याने ते सायन रुग्णालय, जे. जे. रुग्णालय व काही अनाथाश्रमातील गरजूंना वाटप करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.
























