Mansukh Hiren : मनसूखची गाडीत हत्या केली, शव खाडीत फेकलं आणि आरोपींनी ढाब्यावर पोटभर जेवण केलं; NIA च्या चार्जशीटमध्ये नोंद
Mansukh Hiren Murder Case : मनसूख हिरेनची हत्या झाल्यानंतर आरोपींनी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदिप शर्मा यांना फोन लावला आणि तिकडून केवळ ओके असं उत्तर आलं असं NIA ने आपल्या चार्जशीटमध्ये नोंदवलं आहे.
मुंबई : मनसूख हिरेन हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एनआयएच्या चार्जशीटमधून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. मनसूख हिरेनची हत्या केल्यानंतर चार आरोपींनी ठाण्यातील एका ढाब्यावर जाऊन पोठभर जेवण केलं होतं असं एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये नोंदवलं आहे. आनंद जाधव, संतोष शेलार, मनीष सोनी आणि सतीश मोतकुरी उर्फ टन्नी या चार आरोपींची नोंद एनआयएने केली आहे.
मनसूख हिरेनची हत्या कशी केली?
आरोपी आनंद जाधवने एनआयएला दिलेल्या जबाबात सांगितलं आहे की, त्याने इतर तीन आरोपींच्या मदतीने 4 मार्चला मनसूख हिरेनची हत्या केली. त्या आधी 3 मार्चला त्या ठिकाणची रेकी करण्यात आली होती. 4 मार्चला मनीष सोनीच्या लाल रंगाच्या तवेरातून ते घोडबंदर रोडवरुन ठाण्याच्या दिशेने गेले.
ठाण्यामध्ये आल्यानंतर मनसुख हिरेन या लाल तवेरामध्ये मधल्या सीटवर बसला. थोड्या वेळाने सतिश मोतकुरी याने मनसुखचे तोंड दाबले आणि तोंडात रुमाल कोंबला. इतरांनी त्याचे नाक दाबले जेणेकरुन त्याला श्वास घेता येणार नाही. दहा ते पंधरा मिनीटांनी त्याचा मृत्यू झाला असं लक्षात आल्यानंतर गाडी सुरु केली, कसेली पुलावर पोहोचतात त्याचा मृतदेह खाडीमध्ये फेकण्यात आला असं आनंद जाधवने आपल्या जबाबात सांगितलं आहे.
मनसूख हिरेनची हत्या झाल्यानंतर आरोपींनी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदिप शर्मा यांना फोन लावला आणि तिकडून केवळ ओके असं उत्तर आलं. त्यानंतर सर्व आरोपी ठाण्यातील काठियावाडी ढाब्यावर गेले आणि पोटभरुन जेवण केल्याचं एनआयएच्या चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे.
अँटिलिया आणि मनसूख हिरेन प्रकरणात सचिन वाझेने वसुली केलेल्या पैशांचा वापर: NIA
परमबीर सिंहांचा मनसूख हिरेन हत्याकांडात सहभाग?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचाही मनसूख हिरेन हत्याकांडात सहभाग असल्याचा संशय बळावलाय. एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये अशा अनेक पुराव्यांचा संदर्भ दिला आहे ज्यामध्ये परमबीर सिंह यांनाही या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं जात आहे. या प्रकरणी एनआयएने अधिक तपास केला असता ज्या अधिकाऱ्याचे नाव समोर आलं तो अधिकारी परमबीर सिंहाच्या जवळचा मानला जातो. त्या अधिकाऱ्याने दहा वर्षे परमबीर सिंहाच्या सोबत काम केलं आहे. एनआयएने या अधिकाऱ्याची चौकशी केली असता परमबीर सिंहांचे नाव समोर आलं आहे.