Mansukh Hiren Death Case : NIAने पोलीस अधिकारी सुनील माने यांच्या सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले; 4 मार्च रोजी माने कुठे-कुठे गेले?, शोध सुरु
Mansukh Hiren Death Case : एनआयएनं मनसुख हिरण हत्या प्रकरणी पोलीस अधिकारी सुनील माने यांना अटक केली आहे. याप्रकरणी एनआयएकडून त्यांच्या सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. मनसुख हिरण यांची हत्या झाली त्यादिवशी सुनील माने कुठे होते, याचा शोध सुरु आहे
Mansukh Hiren Death Case : मनसुख हत्या प्रकरणी नवनवे खुलासे होत आहेत. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएनं काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी सुनील माने यांना अटक केली होती. याप्रकरणी एनआयए कसून तपास करत आहे. अशातच याप्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सनील माने 4 मार्च रोजी मुंबईत नव्हतेच, ही अत्यंत महत्त्वाची बाब तपासात समोर आली आहे. एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असा संशय आहे की, सुनील माने हे मनसुख हिरण यांची हत्या झाली त्या दिवशी ठाण्यातच होते.
एनआयएकडे याप्रकरणाचा तपास जाण्यापूर्वी महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत होती. त्यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांचा जबाब एटीएसनं नोंदवला होता. सचिन वाझे यांनी सांगितलं होतं की, मनसुख हिरण यांची हत्या झाली त्या दिवशी ते दिवसभर आपल्या ऑफिसमध्येच होते. तसेच रात्री डोंगरीमध्ये त्यांनी छापेमारीही केली होती. एनआयएच्या तपासात सचिन वाझेंनी एटीएसला दिलेला जबाब खोटा असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यादिवशी सचिन वाझे आपला मोबाईल ऑफिसमध्येच ठेवून ट्रेन पकडून ठाण्याला गेले होते. तसेच याप्रकरणी आपल्या जबाबात सुनील माने यांनी सांगितलं होतं की, ते त्यादिवशी आपल्या ऑफिसमध्येच होते. त्यांच्या मोबाईलचं लोकेशनही त्यांच्या ऑफिसमध्येच दाखवत होतं. परंतु, एनआयएच्या तपासादरम्यान हाती लागलेल्या माहितीनुसार, सुनील माने यांनीही आपला मोबाईल आपल्या ऑफिसमध्येच ठेवला होता. त्यानंतर तो ठाण्याला गेला होता. यासंदर्भातील काही पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत.
मुंबई पोलिसांकडून आणखी काही लोकांची चौकशी
एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी सुनील माने यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांचीही क्राईम ब्रांचच्या युनिट 11 मध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांची एनआयएकडून सलग चौकशी करण्यात येत आहे. एनआयएने या सर्वांकडून सुनील माने त्यादिवशी नेमके कुठे होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारी विभागात एक नियम आहे, जेव्हाही एखादी सरकारी अधिकारी सरकारी गाडीचा वापर करतो, त्यावेळी त्या गाडीचा चालक एका रजिस्टरमध्ये गाडी केव्हा आणि कुठे गेली होती याची नोंद करतो. एनआयएने सुनील माने यांच्या सरकारी गाडीचं रजिस्टर आपल्या ताब्यात घेतलं आहे.
मृत मनसुख हिरण यांचा चेहरा झाकलेले रुमाल सचिन वाझे यांनीच खरेदी केले होते
राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए मागील अनेक दिवसांपासून मनसुख हिरण हत्या आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलातील तीन पोलिसांचा समावेश आहे. तर एक निलंबित हवालदार आणि एक क्रिकेट बुकी यांनाही अटक करण्यात आली आहे.
ज्या दिवशी म्हणजे 5 मार्च रोजी जेव्हा मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा इथल्या रेती बंदरमध्ये सापडला होता, तेव्हा त्यांचा चेहरा मंकी कॅपने झाकलेला होता. यामध्ये अनेक रुमालही आढळले होते. एनआयएला नुकतंच तपासात समजलं की, "ते सर्व रुमाल 4 मार्च रोजी कळवा रेल्वे स्टेशनच्या बाहेर रुमाल विक्रेत्याकडून खरेदी केले होते. हे रुमाल खरेदी करणारा इसम दुसरा तिसरा कोणी नसून सचिन वाझे होता."
महत्त्वाच्या इतर बातम्या :