आगामी 14 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सरसकट महाविकास होणार नाही : नवाब मलिक
स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणुका होणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही. अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
मुंबई : आगामी राज्यातील 14 महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होईलच असं नाही. आम्ही स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊनच निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत, अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
याबाबत अधिक बोलताना नवाब म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत, अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. तिथले स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार आहे. स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणुका होणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही. अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान राज्य सरकार एका धर्माच्या विरोधात काम करत आहे, असा भाजपचा आरोप असेल तर मग मोदीसाहेब बोलत आहेत ते सर्व धर्माच्या विरोधात बोलत आहेत का? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला. हे सरकार एका धर्माच्या विरोधात काम करत आहे असा भाजपचा आरोप असेल तर मग मोदीसाहेब बोलत आहेत ते सर्व धर्माच्या विरोधात बोलत आहेत का? सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे तो धुडकावण्याचे काम जनतेने करावे का? अशी भूमिका भाजप आमदारांची असेल तर त्यांना विधानसभेच्या सदस्यपदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे.
भाजप आमदांराच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे. जो सुप्रीम कोर्टाचा आदर करत नसेल, स्वतःच्या पक्षाच्या नेत्याचे ऐकत नसेल त्यांचं लोकं किती ऐकतील असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. देशाचे पंतप्रधान मन की बातमध्ये भविष्यात सण येत असताना गर्दी होणार नाही याची सरकारने काळजी घेतली पाहिजे असं सांगत होते. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने सणासुदीला गर्दी करु नका याची दक्षता राज्य सरकारने घेतली पाहिजे असे निर्देश दिले होते. असे असताना भाजपचे आमदार अशी वक्तव्य करत असल्यामुळे नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.