कोकणात मागेल त्या गावी एसटी, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा उपक्रम!
कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मागेल त्या गावी एसटी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने याची घोषणा केली आहे.
मुंबई : गणेशोत्सवामध्ये कोकणवासीयांना आपल्या गावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मागेल त्या गावी एसटी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यासाठी दोनशेहुन अधिक एसटी बसेसचं बुकिंग कोकणवासियांनी केललं आहे. 10 ते 12 तारखेपर्यंत याहून अधिक एसटी बसेसची मागणी असल्याने त्याही कोकणवासीयांना पुरवण्यात येणार आहेत.
कोरोनामुळं यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांनी हा उत्सव रद्द करुन तो साध्या पद्धतीने करण्यास सकारात्मक पाऊल उचलेलं आहे. कोकणातला गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांसाठी सर्वात मोठा सण आणि उत्सव असतो. त्यामुळे हा उत्सव कोकणात जाऊन आपल्या घरी साजरा करावा, अशी कोकणवासीयांची इच्छा आहे. यासाठी राज्य शासनाने काही अटी आणि शर्ती घालून कोकणवासीयांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामुळे प्रवाशांना दिलासा
याचा फायदा घेत अनेक खाजगी कंपन्यांनी आपल्या गाड्या उपलब्ध करून कोकणवासीयांकडून अवाच्या सव्वा भाडे आकारुन कोकणात सोडण्यासाठी गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत. यामध्ये कोकणवासीयांची पिळवणूक होऊ नये म्हणून गणेशोत्सवाला कोकणात जाता यावं यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कोकणवासीयांसाठी विशेष गाड्यांची योजना सुरू केलेली आहे. कोकणात जाण्यासाठी अनेक खाजगी गाड्यांचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर कोकणवासीयांना परवडणाऱ्या दरात आणि त्यांना हव्या असणाऱ्या गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाने ही योजना सुरू केलेली आहे. मागेल त्याला एसटी, मागेल त्या गावी जाणाऱ्या एसटी, याअंतर्गत कोकणवासीयांसाठी गणेश उत्सवा निमित्त ही खास सेवा सुरू केली आहे. या सेवेला कोकणवासीय देखील चांगला प्रतिसाद देत आहेत.
कोरोनाच्या काळात कोकणात सुरक्षित आणि कमी दरात आपल्या गावी जाता यावं यासाठी चाकरमान्यांनी एसटीचा पर्याय निवडलेला आहे. आपल्या गावी जाण्यासाठी कोकणवासीय कुर्ला, परळ, मुंबई सेंट्रल, मैत्री पार्क या परिसरातील विभागात जाऊन एसटीचे बुकिंग करत आहेत. महामंडळाने या सेवेसाठी ॲप द्वारे बुकिंग सुरु केलेले आहेत. यालाही कोकणवासीय चांगला प्रतिसाद देत आहेत.
कोकणात मागेल त्या गावी एसटी
कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना ग्रुप बुकिंग करता येते. एका गावात जर 15 पेक्षा जास्त लोक असतील तर त्यांना एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका एसटीमध्ये 22 लोक प्रवास करतील. एसटीचं पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 5 ते 12 ऑगस्ट या कालावधीमध्ये ही सेवा देण्यात येणार आहे. एसटीच्या योजनेला कोकणवासियांनी चांगला प्रतिसाद दिला. दिनांक 9 ते 12 या चार दिवसांमध्ये ज्यादा बसेस सोडण्याची सुविधा सुध्दा एसटीने उपलब्ध करून दिलेली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली जाहीर
कोरोनाच्या काळात संपूर्ण राज्यातील एसटी सेवा ठप्प झाल्या होत्या. मात्र, आता हळूहळू ही सेवा पुन्हा कार्यान्वित होऊ लागलेली आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना जाता यावं यासाठी अनेक गावातील नागरिकांनी एसटी महामंडळाला विनंती केली होती. राज्य सरकारच्या परवानगीने यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीयांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी मागेल त्या गावी एसटी हा उपक्रम सुरू केलेला आहे. नागरिकांना घर बसल्या आपल्या गावी जाण्यासाठी एसटीचे बुकिंग करता यावं यासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करण्याचीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. याला नागरिक चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती मुंबई आगर प्रमुख संजय सुर्वे यांनी दिली.
काल दुपारी मी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीवर कोकणात गणेशोत्सवासाठी बसेस सुरु केल्याची बातमी ऐकली. त्यामुळे मी तातडीने कुर्ला बस स्थानकावर येऊन या संदर्भातील चौकशी केली. आज मला माझ्या कुटुंबियांसाठी रत्नागिरीला जाण्यासाठी आरक्षण उपलब्ध झालेलं आहे. आम्ही खाजगी गाडीचा पर्याय शोधला होता. मात्र, त्याचं भाडं आम्हाला परवडणारं नव्हतं, पण एसटीचे बुकिंग मिळाल्यामुळे आम्ही समाधानी आहोत. काही दिवसापासून वाटत होतं की यंदाचा गणेशोत्सव कोकणामध्ये आपल्या गावी जाऊन साजरा करण्याची संधी उपलब्ध होणार नाही. पण राज्य सरकार आणि एसटी महामंडळानं एसटी बसेस सुरू केल्यामुळे आता आमच्या गावी जाऊन हा उत्सव साजरा करता येणार आहे. याचा विशेष आनंद मला वाटत असल्याचं विशाल देसाई या प्रवाशाने सांगितले.
गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाची सेवा सुरू