BJP On Bhushan Desai : भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशाला गोरेगाव भाजपचा विरोध; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
BJP On Bhushan Desai : शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशाला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे.
BJP On Bhushan Desai : शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई यांनी वडिलांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशाला काही तास उलटत नाही तोच विरोध सुरू झाला आहे. गोरेगावमधील (Goregaon) भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी या पक्ष प्रवेशाला विरोध केला आहे. भाजपचे गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना याबाबतचे पत्र लिहीले आहे.
भूषण देसाई यांच्या शिवसेना-शिंदे गटातील प्रवेशामुळे स्थानिक राजकारण पेटण्याची शक्यता आहे. भ्रष्ट व्यक्तीमत्व असलेल्या नेत्यांच्या मुलांना पक्षांमध्ये प्रवेश न देण्याची मागणी भाजपचे गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे.
भूषण सुभाष देसाई हे फक्त आणि फक्त कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक व्यवहारातून वाचण्यासाठीच आपल्याकडे आले असल्याचा आरोप संदीप जाधव यांनी केला. भ्रष्ट आणि मलीन चरित्र्याच्या व्यक्तिमत्त्वाला आपण राजकीय आश्रय दिल्यामुळे गोरेगावकरांमध्ये संतप्त भावना असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. भाजप आणि शिवसेनेची युती आहे. त्यामुळे एका मित्राने केलेली एक चूक दोन्ही पक्षांना महागात पडू शकते असेही जाधव यांनी म्हटले.
मुंबई उपनगरातील गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सुभाष देसाई 1990, 2004, 2009 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून गेले होते. त्यानंतर 2014 मध्ये भाजपच्या विद्या ठाकूर यांनी त्यांचा 4,756 मतांनी पराभव केला होता. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे. त्यामुळे आता, भाजपने भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केल्याने महापालिका निवडणुकीत काय परिणाम होईल, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
मुलाच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुभाष देसाईंनी काय म्हटले?
माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी म्हटले. भूषण याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार असल्याचा निर्धार देसाई यांनी व्यक्त केला आहे.