(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Parab On Sai Resort: किरीट सोमय्या हे नौटंकीबाज, अनिल परबांचा हल्लाबोल; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा
Anil Parab On Sai Resort: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे नौटंकीबाज असून माझी बदनामी करत असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटले. सोमय्या यांनी भाजप नेत्यांविरोधात आवाज उठवावा असे आव्हानही परब यांनी दिले.
Anil Parab On Sai Resort: साई रिसॉर्ट प्रकरणावरून (Sai Resort Dapoli) शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. किरीट सोमय्यांकडून (Kirit Somaiya) वारंवार मला त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांच्यात हिंमत असेल तर शिंदे गटात गेलेल्यांविरोधात बोलून दाखवावे असे आव्हान परब यांनी दिले. साई रिसॉर्टची मालकी माझी नसून सदानंद परब यांची असल्याचेही परब यांनी स्पष्ट केले. सोमय्या यांच्याविरोधात आता फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे परब यांनी म्हटले.
दापोलीतील साई रिसॉर्टचे आज पाडकाम करण्यात येणार होते. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोर्टाने या कारवाईला स्थगिती दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी म्हटले की, आज कोर्टाने रिसॉर्टच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या रिसॉर्टला कोर्टाचे संरक्षण आहे. या रिसॉर्टचे बांधकाम करण्यासाठी शासनाने परवानगी दिली. त्यामुळे शासनाने परवानगी दिली असेल आणि ती चुकीचे असेल तर मालकाचा किती दोष आहे, हे तपासावे लागेल असे परब यांनी म्हटले. साई रिसॉर्टवर लावण्यात येणारा नियम हा सगळ्याच रिसॉर्टला लावावा लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
किरीट सोमय्या माझी बदनामी करत असल्याचा आरोप परब यांनी केला. जे शिंदे गटात गेलेत त्यांच्यावर बोलण्याची हिंमत सोमय्या यांच्यात नाही. नारायण राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी सोमय्या हातोडा घेऊन गेले नाहीत. सुभाष देशमुख यांचे घरदेखील अनधिकृत आहे. मात्र, सोमय्या तिकडे जाणार नाहीत. सोमय्या हे स्टंट नाही तर नौटंकी करत असल्याचे परब यांनी म्हटले.
सोमय्यांनी आरोप केलेले नेते त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्याबाबत आता एक शब्दही ते काढत नसल्याचे परब यांनी म्हटले. जनतेला हा सगळा प्रकार समजत असल्याचे सांगत सोमय्या यांच्यामुळे रत्नागिरीतील इतर रिसॉर्ट चालकांना फटका बसला असल्याचे परब यांनी सांगितले. रिसॉर्ट प्रकरणी चौकशी करणाऱ्या यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे परब यांनी सांगितले.
आमच्याकडे ही यादी
कोणाचे किती अनधिकृत बांधकाम आहे, याबाबतची यादी आमच्याकडे असून वेळ आल्यास त्यांची नावे बाहेर काढू असा इशाराही परब यांनी दिला. माझ्यावर होत असलेले आरोप वैयक्तिक चारित्र्यहनन करण्यासाठी केले जात आहे. मी न्यायलयीन लढाई लढणार असून कोर्टातून निर्दोषत्व सिद्ध करणार असल्याचे त्यांनी म्हटले.