Uddhav Thackeray : संजय राऊतांना अटक: उद्धव ठाकरे यांनी घेतली राऊत कुटुंबीयांची भेट
Uddhav Thackeray : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत कुटुंबीयांची त्यांच्या घरी जावून भेटली.

Uddhav Thackeray : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक (Sanjay Raut Arrested) झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राऊत कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्री, पत्नी वर्षा, मुलगी आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्ष आणि आपण स्वत: संजय राऊत यांच्या पाठिशी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. शिवसेनेत बंड झाल्यानंतर संजय राऊत यांनी भक्कमपणे उद्धव ठाकरे यांची बाजू मांडली. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यातही राऊत यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे ईडीने रविवारी रात्री संजय राऊत यांना अटक केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. आज पत्रकार परिषद घेण्याआधीच उद्धन ठाकरे यांनी राऊत कुटुंबीयांची भेट घेतली.
काळजी नको, शिवसेना सोबत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी भांडुपमधील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंतदेखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. ही वैयक्तिक आणि कौटुंबिक भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. या भेटीत उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच शिवसेना आणि आपण स्वत: तुमच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. अवघ्या दहा मिनिटांची ही भेट होती. भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राऊत कुटुंब खिडकीत आलं होतं. संजय राऊत यांच्या मातोश्री, पत्नी, दोन मुलींसोबत कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली.
राऊत यांना अटक
रविवारी (31 जुलै) दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्या संदर्भात ही अटक झाल्याची माहिती आहे. आज दुपारी पीएमएलए कोर्टात संजय राऊत यांना हजर करण्यात येणार आहे.























