(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#Maharashtra : काँग्रेस आमदारांनाही मुंबईत हजर राहण्याचे फर्मान ! नाराज आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात ?
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेसह काँग्रेसची सुद्धा चांगलीच नाचक्की झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांनाही सायंकाळी 4 वाजता मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीला भाजपने भगदाड पाडून पाचवी जागा निवडून आणली. यामध्ये महाविकास आघाडीची पहिल्या पसंतीची मते फुटल्याने महाविकास आघाडीत रणकंदन सुरु झालं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडाच्या पावित्र्यात असून त्यांनी सुरतमध्ये तळ ठोकला आहे. सुरतमधील हाॅटेल मेरेडियनमध्ये त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह तळ ठोकला आहे. ते आज 12 वाजता भूमिका स्पष्ट करणार आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेसह काँग्रेसची सुद्धा चांगलीच नाचक्की झाली आहे. पहिल्या पसंतीचा उमेदवार पराभूत झाला, तर दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर भाई जगताप विजयी झाले. त्यामुळे काँग्रेसकडूनही आता नाराजी उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांनाही सायंकाळी 4 वाजता मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काँग्रेस मानहानीकारक पराभवानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत.
'महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल'
महाविकास आघाडीमध्ये राजकीय भूकंप होण्याची चिन्हे असतानाच काँग्रेसने महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी दिली आहे. काँग्रेसला महाविकास आघाडीत काय मिळतंय? याचा विचार करणं गरजेचं असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेत्यांची दिल्लीत धाव
पक्षातील नाराजीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आज दिल्लीला जाणार आहेत. पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानं काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. पक्षश्रेष्ठींना भेटून पक्षातील या घडामोडी त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या