Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात राजकीय भूकंप; देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल
Maharashtra Political Crisis : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले आहेत,
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात येत्या काही तासात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याची माहिती आहे. विधान परिषद निवडणुकीत झटका बसल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यातील विधान परिषद निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. सोमवारी रात्रीपासून शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर गेले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 12 आमदार असल्याची माहिती समोर आली होती. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि इतर अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. सूरतमधील हॉटेलमध्ये 25 आमदार असल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांचीदेखील भेट घेण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेनेतील धुसफूस बाहेर
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे.
शिंदे घेणार टोकाची भूमिका?
गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. रात्रीच्या सुमारास 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधींनी देखील काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही फोन नॉटरिचेबल लागला होता. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील 'वर्षा' या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.