Yakub Memon: याकूबच्या चुलतभावासोबत फडणवीस आणि राज्यपालही! फोटो शेअर करत शिवसेना-काँग्रेसकडून भाजपवर हल्लाबोल.
Congress Shivsena On Rauf Memon: याकूब मेमनच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादाला राजकीय रंग चढू लागला आहे. भाजपने केलेल्या आरोपांना शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.
Congress Shivsena On Rauf Memon: याकूब मेमनच्या कबरीच्या (Yakub Memon) सजावटीसाठी टायगर मेमनच्या (Tiger Memon) नावाची धमकी देणाऱ्या रऊफ मेमनसोबतच्या बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत आलेल्या किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) भाजपवर (BJP) जोरदार पलटवार केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमन आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. आरोप करणाऱ्या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन द्यावे खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांचा फोटो ट्वीट केला आहे.
मुंबईतील बडा कब्रस्तान येथे याकूब मेमनची कबर आहे. या कबरीची सजावट केल्याचे समोर आले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. किशोर पेडणेकर आणि रऊफ मेमनसोबतच्या बैठकीतला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी किशोरी पेडणेकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. महाविकास आघाडीचे नेते आणि टायगर मेमन, दाऊदच्या संबंधाच्या चौकशीची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि काँग्रेसने भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.
किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि रऊफ मेमन याचा फोटो ट्वीट केला. भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे असे टोलाही त्यांनी लगावला. किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट केलेल्या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील दिसत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे pic.twitter.com/OO2ldr2iYd
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 10, 2022
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि रऊफ मेमन यांचा फोटो शेअर करत सावंत यांनी रऊफ मेमन ते हेच का? असा प्रश्न केला आहे.
रऊफ मेमन ते हेच का?....🤔 pic.twitter.com/QCyg62xyAG
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 10, 2022
भाजपने काय म्हटले होते?
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार, किशोरी पेडणेकर हे एका बैठकीत आहेत. या बैठकीत रऊफ मेमनही उपस्थित आहे. त्याशिवाय, इतर व्यक्ती, अधिकारीदेखील दिसत आहे. ही बैठक बडा कब्रस्तानच्या
बैठकीतील असल्याचे म्हटले जात आहे. बडा कब्रस्तान आणि जुमा मशिदीशी संबंधित नसतानाही रऊफ त्या बैठकीत उपस्थित होता अशी माहिती समोर येत आहे. हा व्हिडिओ 2021 मधील असल्याचे म्हटले जात आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. बडा कब्रस्तानच्या ट्रस्टींना टायगर मेमनच्या नावाने धमकी देण्यात आली. त्याची तक्रार करण्यात आली. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ट्रस्टींनी अल्पसंख्याक मंत्री म्हणून नवाब मलिक यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. याकूब मेमनची कबर सजवण्यासाठी दुबईवरून आदेश आले. मात्र, नवाब मलिक यांचे दाऊदशी असलेले संबंधांमुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही. तर, मुख्यमंत्रीपदाच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रकरणात कोणतेही चौकशीचे आदेश दिले असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि मेमन कुटुंबियांशी असलेल्या संबंधांची चौकशीची मागणी भातखळकर यांनी केली आहे.