Devendra Fadnavis : विनायक मेटे म्हणतात, आमच्या मनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच...!
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आदर असला तरी देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असे प्रतिपादन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केले.
Devendra Fadnavis : गेल्या अडीच वर्षात केवळ भ्रष्टाचार गेल्या सरकारने केला. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचे काम मागील सरकारने केले. आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचा आम्हाला आदर आहे पण आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहेत असे वक्तव्य शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम असल्याची चर्चा सुरू असताना आता मेटे यांनी केलेल्या वक्तव्याने नवे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
मुंबईतील वाय.बी. चव्हाण केंद्रात विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी हे उद्गार काढले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आदीदेखील उपस्थित होते. विनायक मेटे यांनी म्हटले की, मी या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये अनेक वेळा मोर्चे काढले, पण उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठा समाजाच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. आरक्षण देण्याचं काम तुम्ही केले. मागील सरकारने एकाही समाजाला न्याय दिला नाही. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण यांनी घालवले. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचं काम मागील सरकारने केला असल्याची टीका मेटे यांनी केली. तुमच्याबद्दल खात्री असून तुम्ही समाजाला न्याय द्याल, अशी अपेक्षा विनायक मेटे यांनी व्यक्त केली. आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचा आम्हाला आदर आहे पण आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहेत, असेही मेटे यांनी म्हटले. तुम्ही सरकारमध्ये घेण्याचा शब्द दिला होता. तो शब्द जरी पाळला नसला तरी आम्ही तुमच्या सोबत असू असेही मेटे यांनी म्हटले.
देवेंद्र यांच्या नेतृत्वाचे सरकार : चंद्रकांत पाटील
गेले अडीच वर्ष आपण सगळ्यांनी वाट पाहिली. रात्री नंतर दिवस येतो असं बोलतात ,पण हे खरं झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे सरकार आले असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. मी वारंवार बोलायचो सरकार येईल, पण आलेच. राज्याचा कारभार चालवताना सगळ्याच गोष्टी मागे शक्य झाल्या नाही, मात्र आता होतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, तो पर्यंत मराठा समाजाला न्याय मिळालं. आता पुन्हा फडणवीस आले, सर्वांना न्याय मिळेल. देवेंद्र फडणवीस यांनी 'बदला' नावाचा एक पोर्टफोलिओ उघडला पाहिजे आणि एक कडक आमदार नेमला पाहिजे. जो मंत्री मागच्या अडीच वर्षाच्या काळातील घोटाळ्याची यादी तयार करील असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.