एक्स्प्लोर
कुठे दुचाकीची अंत्ययात्रा तर कुठे बैलगाडी मोर्चा! इंधन दरवाढीविरोधात राज्यभर शिवसेना रस्त्यावर
Maharashtra Shiv Sena protest : एकीकडे वीजबिलाच्या मुद्यावरुन भाजप महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले गेले.
Maharashtra Shiv Sena protest : एकीकडे वीजबिलाच्या मुद्यावरुन भाजप महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले गेले. राज्यभर मोदी सरकारच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली. शिवसेनेकडून जागोजागी निदर्शनं करण्यात आली. कुठे दुचाकीची अंत्ययात्रा तर कुठे बैलगाडी मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
मुंबईत जागोजागी शिवसैनिकांचं आंदोलन
मुंबई - आज मुंबईत शिवसेनेकडून इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला गेला. मुंबईतील दादर, गिरगाव, भायखळा , वडाळा, वांद्रे याभागात मोठ्या संख्येने सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. भायखळा भागातील आंदोलनात महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैलगाडीत बसून या आंदोलनात इंधन दरवाढी विरोधात निषेध व्यक्त केला.
परभणीत शिवसेनेचा इंधन दरवाढी विरोधात मोर्चा
इंधन दरवाढी विरोधात परभणीत शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यलयावर दुचाकी ढकलत, सायकल चालवत शिवाय बैलगाडी घेऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तात्काळ इंधन दरवाढ कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलीय.
जालना- शिवसेनेकडून स्कुटीची अंत्ययात्रा
इंधन दरवाढी विरोधात आज जालन्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. शहरातील गांधी चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनात दुचाकींची पेट्रोल दर वाढीमुळे आत्महत्या दाखवून तिची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या दरवाढीचा निषेध केला. दरम्यान मोदी सरकार गादीवर आल्यापासून सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले असून इंधन दर वाढ सरकारने तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी खोतकर यांनी केलीय.
शहापूर - पेट्रोल- डिझेल दरवाढ झाल्याने केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयापर्यंत बैलगाडी घेऊन शेकडो शिवसैनिकांसह मोर्चा काढण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली असून सेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आला आहे
भिवंडी
भिवंडीत तहसील कार्यालयाबाहेर निदर्शनं
इंधन दरवाढीविरोधात भिवंडीमध्ये शिवसेनेच्या वतीनं निदर्शने करण्यात आली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या इंधन दरवाढीची सर्व सामन्यांना प्रचंड झळ बसत आहे. केंद्र सरकार यावर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी शिवसेनेने केला आहे. केंद्र सरकारने यावर वेळीच नियंत्रण आणावं अशी मागणी करत निदर्शने करण्यात आली. जर इंधन दरवाढ माघार घेतली नाही तर सेनेच्या वतीने उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे . दरम्यान मागण्यांचे निवेदन तहसीलदार अधिक पाटील यांना दिलं आहे.
नांदेडमध्ये बैलगाडीचा धडक मोर्चा
केंद्रसरकार हाय हाय ,मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत नांदेड येथे शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीचा धडक मोर्चा काढण्यात आला. कोरोना संकटातून सामान्य नागरिक अद्यापही सावरला नाही. सर्वसामान्यांची जगण्यासाठी प्रचंड धडपड सुरू आहे. बेरोजगारी पराकोटीची वाढली आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असताना पुन्हा सामान्य माणसाला देशोधडीला लावणारी महागाई गगनाला भिडलेली असल्याचा आरोप करत शिवसेनेने केंद्रसरकारच्या विरोधात बैलगाडी मोर्चा काढण्यात आलाय.
पुढची आंदोलन अजून तीव्र होतील- अनिल परब
मुंबईत आंदोलनात सहभागी झालेल्या मंत्री अनिल परबांची केंद्र सरकारवर टिकेची झोड बनवली. ते म्हणाले की, आज शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. हा शिवसेनेचा पिंड आहे. अन्याय झाला, मुस्कटदाबी होते तेव्हा सेना उफाळून उठते. शिवसेना मनमानी मान्य करणार नाही. आजचा इशारा मोर्चा आहे. राज्य सरकार प्रश्न सोडवायला सक्षम आहे पण केंद्राचा वरवंटा फिरतोय . ते कुणाला जुमानत नाहीत. त्यांना हवे तसे दरवाढ करत आहेत. वर्षाला एसटी चालवायला 3 हजार कोटींचं डिझेल लागतं. या दरवाढीचं ओझं राज्य सरकार किंवा जनतेच्या खांद्यावर येतं. पुढची आंदोलन अजून तीव्र होतील, असं परब म्हणाले.
उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा
इंधन दरवाडी विरोधात शिवसेनेकडून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले जात आहे. आज उल्हासनगर येथे देखील शिवसनेकडून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत इंधन दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. उल्हासनगरच्या महापौर लीलाताई आशान या बैलगाडीत स्वार होत आंदोलनात सहभागी झाल्या होत्या .यावेळी पवई चौक प्रांत कार्यलयासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.
पंढरपुरात शिवसेनेचं आंदोलन
आज पंढरपूर शहर आंदोलनाने ढवळून निघाले. वीज दरवाढी विरोधात विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकून भाजपने ठाकरे सरकारच्या विरोधात आंदोलन केले. याचवेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे आणि महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी गाड्या ढकलत आणि चुलीवर स्वयंपाक करत पेट्रोल , डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध करत मोदी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. शिवसेनेकडून आज पंढरपूर तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढत दुचाकी ढकलत तर काही दुचाकी बैलगाडीवर ठेवत मोदी सरकारकडून होत असलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध केला. याचवेळी महिला आघाडीने तहसील कार्यालयावर चूल मांडून भाकऱ्या थापत गॅस दरवाढीचा निषेध केला. यावेळी शिवसैनिक व महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयावर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे राज्यभर आंदोलन केलं. कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळमध्ये केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. कुडाळ शाखा ते तहसीलदार कार्यालया पर्यंत यावेळी मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात कुडाळ-मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात 8 ठिकाणी तहसीलदार कार्यालयावर शिवसेनेने पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आला. इंधनाची दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांवर परिणाम होत आहे. म्हणून पक्षप्रमुखांच्या आदेशाने आज शिवसेना इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केलं.
चंद्रपूर : चंद्रपुरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. शहरातील गांधी चौकातून आणि मुख्य रस्त्यांवर फिरला इंधन दरवाढीविरोधात मोर्चा निघाला. शिवसैनिकांनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा यावेळी मागितला. मोदी सरकारने देशातील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. गॅस-पेट्रोल-डिझेल यांच्या दरवाढीने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलं आहे. तातडीने ही दरवाढ मागे घेत देशवासीयांना दिलासा देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement