Vedanta Foxconn : फडणवीसांनी वेदांताचे 'या'साठी मानले आभार; विरोधकांवरही साधला निशाणा
Devendra Fadnavis On Vedanta Foxconn : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्यावर सुरू असलेल्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
Devendra Fadnavis On Vedanta Foxconn : वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपाने चांगलेच तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मौन सोडले आहे. वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल फडणवीस यांनी वेदांता समूहाचे अनिल अग्रवाल यांचे आभार मानले आहेत. तर, सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांवर फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. राजकीय स्वार्थसाठी निराधार दावे केले जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून म्हटले की, वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अनिल अग्रवाल यांचे आभार मानतो. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू असेही फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले. विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत. महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? असा सवालही त्यांनी केला. स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करण्याचा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2022
महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू. https://t.co/2X0oGP2ujX
माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला?
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2022
स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर !
वेदांताचे अनिल अग्रवाल यांनी काय म्हटले?
वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला असल्याचं अग्रवाल म्हणाले आहेत. जुलैत महाराष्ट्र सरकारनं कसोशीने प्रयत्न केला होता, असे त्यांनी म्हटले.
अनिल अग्रवाल यांनी ट्विटकरून हे स्पष्ट केलं आहे की, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच सर्वोत्तम डील त्यांना कोणत्या राज्याकडून मिळते यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. गुजरातकडून त्यांना सर्वोत्तम डील मिळाली. जुलैमध्ये गुजरात सरकारशी त्यांची चर्चा सुरु होती आणि त्यावेळीच त्यांचा करार निश्चित झाल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य असून भविष्यात राज्यात या प्रकल्पाशी संलग्न प्रकल्प आणण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: