Maharashtra Politics : हिंदूंचे सरकार म्हणवणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी वाऱ्यावर! काँग्रेसची टीका
Maharashtra Politics : हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या सरकारच्या काळात हिंदू शेतकरी अडचणीत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.
Maharashtra Politics : राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी मात्र मदतीपासून वंचित असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे, ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.
नाना पटोले यांनी म्हटले की, राज्यातील सध्याचे सरकार हे केवळ इव्हेंटबाज आहे. या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. आजही पंचनामेच सुरू आहेत. शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवण्यासाठी भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यवतमाळच्या एका गावातील शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला. पण नंतर त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केली. आजही कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी एक कार्यक्रम जाहीर केला पण तो केवळ इव्हेंट आहे. अशा इव्हेंटमधून शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नसल्याचे त्यांनी म्हटले. कृषी मंत्री हा शेती व शेतकऱ्यांची जाण असणारा असायला हवा पण सध्याच्या कृषीमंत्र्यांबाबत तसे नाही. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही, त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख काय कळणार? असा सवाल ही पटोले यांनी केला. एखादा इव्हेंट करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असा त्यांचा दावा असेल तर तो साफ चुकीचा असल्याचेही त्यांनी म्हटले.
सरकार पाडण्यासाठी भाजपकडून काळ्या पैशाचा वापर
भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी काळ्या पैशाचा वापर करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी 3500 कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. बंडखोरी केलेल्या काही आमदारांनी 50 कोटींची ऑफर असल्याचे सांगितले होते. हा काळा पैसा भाजपाकडे कुठून येतो याची सीबीआय, ईडीने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच राज्यातील जे आमदार गुवाहाटीला गेले होते त्यांच्याबद्दल लोकामध्ये आजही संभ्रम असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 200 आमदार निवडून आणण्याचा दावा करत आहेत. पण फुटीर आमदारांच्या मतदार संघातच जनतेचा त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा पटोले यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- महाराष्ट्रात पुन्हा वादळ उठणार, आता काँग्रेसचा गट फुटणार? शिंदे कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता!