(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | मंत्रालयाला कोरोनाचा विळखा, महसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
Coronavirus : मंत्रालयात पुन्हा कोरोनाचा विळखा पाहायला मिळत आहे. महसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच विभागातील इतके कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई : एकीकडे मंत्री कोरोनाबाधित होत असताना मंत्रालयात पुन्हा कोरोनाच्या विळखा पडला आहे. महसूल खात्यातील आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली आहे. महसूल विभागात आज 22 जण आजारी असल्यामुळे गैरहजर होते. त्यातील आठ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर मंत्रालयात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
आधीच एक मागून एक मंत्री पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मंत्रालयातील कर्मचारी पण कोरोनाबाधित झाल्याने सगळ्यांनी धास्ती घेतली आहे. महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेने आजच्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात संघटनेने मंत्रालयात येणाऱ्या अभ्यंगतावर कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येईपर्यंत निर्बंध घालावेत, अशी मागणी केली आहे.
लॉकडाऊन काळात सामान्य नागरिक मंत्रालयात पोहोचू शकत नव्हते. कोरोना रुग्ण आटोक्यात आल्यावर मंत्रालयात आपल्या कामासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. पण बाहेरुन येणाऱ्या लोकांची स्क्रीनिंग होत नाही. मास्क घालणे, शरीराचे तापमान चेक करणे, हे नियम नीट पाळले जात नसल्याची तक्रार संघटनेने केली आहे. त्यामुळे मंत्रालयात कोरोनाचा धोका वाढल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.
त्या पार्श्वभूमीवर अभ्यंगताना सध्या मंत्रालयात निर्बंध घालण्याची मागणी संघटनेने केली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात येईपर्यंत निर्बंध असावे अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
लोक निर्ढावले आणि नियम पाळत नसल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वच खात्यातील कर्मचाऱ्यांनी काळजी घेण्याची सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्यामुळे एकूणच विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मंत्री नाही तर मंत्रालयीन कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढल्याचे चित्र आहे.
दरम्यान, एरव्ही तीन आठवडे चालणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यकाळ यंदा किती असेल याबाबत अजून प्रश्न कायम आहे. संसदीय कामकाज बैठकीत काल (18 फेब्रुवारी) 1 ते 8 तारखेपर्यंतचे कामकाज ठरवण्यात आलं. राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासाठी पुन्हा 25 फेब्रुवारीला बैठक होणार आहे.
संबंधित बातम्या
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी सरकारचा प्लॅन; तर घाबरट सरकार, फडणवीसांची टीका