Disha Salian Case : राणे पितापुत्रांना दिलासा, सत्र न्यायलयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
Narayan Rane : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी दिंडोशी न्यायालयानं आज निर्णय दिला. न्यायालयानं याप्रकरणी राणे पितापुत्रांना दिलासा दिला आहे.
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. नारायण राणे आणि दिशा सालियन मृत्यू (Disha Salian Case) प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दिंडोशीतील सत्र न्यायालयानं आज निर्णय दिला. न्यायालयानं या प्रकरणी राणे पिचा-पुत्रांना दिलासा दिला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वकील सतिश मानेशिंदे म्हणाले की, "केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पंधरा हजार रुपयांच्या हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी अशा प्रकारच्या शुल्लक केसेसकडे लक्ष न देता, ज्या क्रिमिनल केसेस आहेत, त्याकडे जास्त लक्ष द्यावं, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल."
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी दिंडोशी न्यायालयानं आज निर्णय दिला. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा गुन्हा राणे पितापुत्रांविरोधात मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. दिशा सालियनच्या आईनं केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी राणे पितापुत्रांची चौकशीही केली होती. राजकीय दबावामुळे आपल्याला गोवल्याचा आरोप राणेंनी केला होता. आज दिंडोशीतील सत्र न्यायाधीश एस. यू. बघेल राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय दिला.
दरम्यान, दिशा सालियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं वक्तव्य नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर राणे पिता-पुत्रांची चौकशीही करण्यात आली होती.
दिशाच्या पालकांची महिला आयोगाकडे धाव
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिशा सालियनच्या आई-वडीलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. राणेंच्या आरोपांमुळे दिवगंत दिशाची नाहक बदनामी होत असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. त्यानंतर राज्य महिला आयोगाने मालवणी पोलीस ठाण्याकडून दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल मागितला होता.
मालवणी पोलिसांचा अहवाल काय?
दिशाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून तिच्यावर कोणतेही अत्याचार करण्यात आले नव्हते असे अहवालात नमूद करण्यात आले होते. मालवणी पोलिसांच्या अहवालानंतर राज्य महिला आयोगाने नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
काय म्हणाले होते केंद्रीय मंत्री नारायण राणे?
अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. दिशा सालियनची बलात्कार करुन हत्या करण्यात आली असल्याचा आरोप केला होता. पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी म्हटले की, तिनं आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला होता. सुशांतच्या घरातील सावंत नावाचा मुलगा कुठे गेला? तो अद्याप बेपत्ता आहे. तसेच रॉय म्हणायचा मुलगा होता, तो कुठे गेला, तोही अद्याप गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. तसेच दिशा सालियनच्या घरातील वॉचमन कुठे आहे? तो देखील गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. कोण काहीतरी लपवते, हेच यावरुन स्पष्ट होत असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले. लपवलेल्या गोष्टी बाहेर याव्यात असेही राणेंनी म्हटले होते.