मुंबईत थर्टी फस्टचे सेलिब्रेशन यंदाही घरातच! सेलिब्रेशनवर येणार निर्बंध
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्हवर पाचहून अधिक जणांना एकत्र येता येणार नसल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्येही कोरोनाने (Mumbai Corona) बरंच नुकसान केलं आहे. अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे, असे वाटत असताना ओमायक्रॉनच्या (Omicron) एन्ट्रीनंतर आता कोरोना रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. दरम्यान थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन मुंबईत करता येणार नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
सुरेश काकणी म्हणाले, 31 डिसेंबरपर्यंत मुंबईत जेवढे नागरिक कोरोना पॉझिटिव्ह नागरिक आढळतील त्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जाणार आहे. जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचे कारण omicron आहे का हे या चाचणीतून कळणार आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली. नव्या नियमावलीमुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी नाही झाले तर निर्बंध अधिक कठोर करण्यात येणार आहे.
कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतून बाहेर येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात येत आहे. नविन वर्षाच्या स्वागातासाठी अनेक नागरिक बाहेरून येत आहेत.
कोरोना रुग्ण वाढण्याची चार कारणे
1. कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वीप्रमाणे मुंबई शहराची स्थिती झाली आहे.
2. परदेशी नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर मुंबईत दाखल
3. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही
4. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरले जात नाही
मुंबईत आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून 500 हून अधिकच आहे. त्यात रविवारी (26 डिसेंबर) तर तब्बल 922 कोरोना रुग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी (27 डिसेंबर) ही संख्या 809 झाली असली तरी रुग्णवाढीचा आणि दुपटीचा दर मात्र वेगाने वाढत आहे. अवघ्या एका दिवसात रुग्ण वाढीचा दर 0.06 टक्क्यांवरुन 0.07 टक्के इतका झाला आहे. याशिवाय रुग्ण दुपटीचा दरही रविवारी 1 हजार 139 इतका होता. जो एका दिवसात हजारच्या खाली गेला असून 967 दिवसांवर गेला आहे. ही आकडेवारी हा चिंतेचा विषय होऊ लागला आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलीच आहे. पण मुंबईकरांना अधिक काळजी घेण्याची गरजही निर्माण झाली आहे. महापालिकेतर्फे दररोज समोर येणारे कोरोना रुग्ण आणि वाढीचा दर अशा साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यानेच समोर आलेल्या या माहितीनुसार मुंबईकरांनी काळजी घेणे आता अनिवार्य झाले आहे.
- पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वेगाने होईल ते पहावं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
- Mumbai Corona Update : मुंबईत धोका वाढताच, सोमवारीही 809 नवे कोरोना रुग्ण, रुग्णवाढीचा दरही वाढला
- Exclusive : मुलांच्या लसीकरणाबाबत पडलेल्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर; जाणून घ्या चाईल्ड टास्क फोर्सच्या सदस्यांकडून