(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मालाडमधील मैदानाच्या नामकरणाचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता, नामांतरणाचा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीत मंजूर
Mumbai Tipu Sultan Ground controversy : मालाडमधील क्रीडा संकुलाला झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान नाव देण्याचा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीत प्रस्ताव मंजूर झाला आहे
मुंबई : मालाडमधील मैदानाच्या नामकरणाचा वाद (Mumbai Tipu Sultan Ground controversy) पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. मालाडच्या मैदानाचे नाव टिपु सुलतान नव्हे तर झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान नाव देण्याचा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीत प्रस्ताव मंजूर झाला आहे. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर अंमलबजावणी होणार आहे. समाजवादी पक्षाकडून या नव्या नामकरणाला विरोध होता.
मालाड येथील मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून मुंबईतील राजकारण चांगलेच तापले होते. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या पी नॉर्थ विभागातील नगरसेवकांनी या उद्यानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान असे नामकरण करण्याची मागणी केली. त्याबाबतचा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीमध्ये मंजूर झाला असून पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर नामकरण केले जाणार आहे.
मालाड येथील कलेक्टरच्या मालकीच्या भूखंडावर उद्यान असून त्याचे सुशोभीकरण पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले. या उद्यानाला कित्तेक वर्षे टिपू सुलतान या नावाने ओळखले जात असल्याने उद्यानाच्या प्रवेशद्वारावर टिपू सुलतान उद्यान असे नाव लिहिण्यात आले. टिपू सुलतान या नावावरून वाद होत असतानाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी झाशीच्या राणीचे नाव उद्यानाला द्यावे अशी मागणी शिवसेनेची असल्याचे म्हटले होते.
पी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार यांच्यांसह पी उत्तर विभागातील शिवसेना नगरसेवकांनी पत्र देत झाशीची राणी लक्ष्मीबाई नाव द्यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर बाजार व उद्यान समितीच्या सभेत झाशीची राणी लक्ष्मीबाई उद्यान असे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
नामकरणाचे प्रस्ताव पालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवून दिले आहेत. आयुक्तांच्या अभिप्रायनंतर नामकरणाची पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
समाजवादी पक्षाचा नाव बदलण्यास विरोध
भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आपले हिंदुत्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका महापुरुषाचे नाव काढण्यासाठी दुसऱ्या महापुरुषाचे नाव वापरले जात आहे. हे योग्य नाही, शिवसेनेने असे करणे योग्य नाही. झाशीची राणी यांचे नाव देण्याचा हा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती महापौरांना पत्र देऊन झाशीची राणी यांचे नाव मोठ्या वास्तूला द्यावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार , मुंबई महापालिकेतील गटनेते रईस शेख यांनी केली आहे.
संबंधित बातमी :