एसटी कर्मचारी बॅंकेच्या संचालक मंडळाविरोधात बॅंक कर्मचाऱ्यांचे आंदोलन; संचालकांच्या निर्णयाने बँकेवर परिणाम होण्याची भीती
ST Workers : कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाची तीव्रता वाढल्याने मागील 3 ते 4 दिवसांपासून स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅप बॅंकेचे कामकाज ठप्प झाले आहे.
मुंबई : गुणरत्न सदावर्तेंच्या संघटनेच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बॅंकेच्या संचालक मंडळाविरोधात बॅंक कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मागील सात दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची बँक (ST Workers Bank) असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाची तीव्रता वाढल्याने मागील 3 ते 4 दिवसांपासून स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅप बॅंकेचे कामकाज ठप्प झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून एसटी बॅंकेचे कर्मचारी मुंबईत दाखल झाले.
शिवसेना शिंदे गटात सामिल झालेले आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वातील को-आॅपरेटिव्ह बॅंक एम्प्लाॅईज युनियन या संघटनेचे वर्चस्व आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅप बॅंक एम्प्लाॅईज युनियनचे 250 बॅंक कर्मचारी दादरमधल्या आनंदराव अडसूळ यांच्या कार्यालयात दाखल झाले. या कर्मचाऱ्यांनी अडसूळ यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले.
बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन का?
सदावर्तेंच्या संघटनेचे वर्चस्व असलेल्या एसटी बॅंकेच्या संचालक मंडळाविरोधात कर्मचारी एकवटले आहेत. संचालक मंडळाकडून घेतलेले चुकीचे आर्थिक निर्णय, कर्मचाऱ्यांची सुरु असलेली छळवणुकीमुळे बॅंक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले. सदावर्तेंच्या यांच्या संघटनेच्या संचालक मंडळाने व्याजदर 7.50 टक्के इतके खाली आणल्यानंतर आरबीआयकडून यासंदर्भात बॅंकेकडून स्पष्टीकरण मागवले आहेत. त्यासोबतच सहकार आयुक्तांकडे देखील यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संचालक मंडळाकडून बॅंक डबघाईस आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काही सभासदांकडून करण्यात आला होता. त्या भीतीपोटी काही सभासदांकडून ठेवी काढण्यास सुरुवात करण्यात आली होती. जवळपास 150 कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्याची माहिती आहे.
एसटी कर्मचारी बँक महत्त्वाची का?
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेत जवळपास दोन हजार 300 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. सर्वच एसटी महामंडळातील कर्मचारी ह्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे सभासद आहेत. स्टेट बॅंक ऑफ इंडियासोबतच काही
कर्मचाऱ्यांचे पगार एसटी बॅंकेतून होतात. एसटी महामंडळाच्या आजी-माजी एसटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यभराच्या ठेवी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेत आहेत.
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेत 2023 आधी मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेचे वर्चस्व होते. मात्र, सदावर्ते यांच्या संघटनेच्या पॅनलचे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत संपूर्ण संचालक मंडळ निवडून आलं. एसटी कर्मचारी संघटनेत जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या संघटना आहेत. सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या बॅंकांपैकी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंक ही मोठी बॅंक आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर थेट प्रभावही या बँकेच्या माध्यमातून टाकता येतो.