Maharashtra Corona Vaccine Shortage: लस टंचाई; साठा संपल्याने पुन्हा पुरवठा होईपर्यंत नवी मुंबई, पनवेलमध्ये लसीकरण बंद!
दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबई शहरासाठी गरजेपेक्षा 40 टक्के लसीचा पुरवठा कमी दिला जात असल्याचा आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी राज्य सरकारवर केला होता.
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगर पालिका क्षेत्रातीस लसींचा डोस संपल्याने लसीकरण बंद करण्याची वेळ दोन्ही शहरांवर आली आहे. नवी मुंबई मध्ये दिवसाला 8 हजार पर्यंत लसीकरण केले जाते. शहरातील 41 केंद्रावर महानगर पालिका आणि खाजगी रूग्णालयाकडून कोरोनाची लस दिली जात होती. मात्र कोरोनाचे डोस संपल्याने नवी मुंबई महानगर पालिकेच्या कोरोना लसीकरणाला ब्रेक लागला आहे.
नवी मुंबई शहरात आतापर्यंत 1 लाख 43 हजार 721 जणांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे. तर दुसरा डोस घेणारे 21 हजार 442 लोकांनी लाभ घेतला आहे. आज महानगर पालिकेकडे फक्त 4 हजार डोस शिल्लक होते . तेही दिवसभरात संपले असल्याने लसीकरण मोहिम बंद करण्याची वेळ महानगर पालिकेवर आली आहे.
दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबई शहरासाठी गरजेपेक्षा 40 टक्के लसीचा पुरवठा कमी दिला जात असल्याचा आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी राज्य सरकारवर केला होता. ठाणे , कल्याण डोंबिवली , मार भाईंदर या एमएमआरडीए क्षेत्रातील शहरांना कोरोना लसीचा जादा पुरवठा केला जात असताना नवी मुंबई शहराला सापत्न वागणूक का दिली जात आहे असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला होता.
नवी मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह संख्या दिवसाला दीड हजारांच्या घरात गेल्याने मोठ्या प्रमाणात लसीकरणाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या लसी संपल्या असल्याची माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी राज्य सरकारला दिली आहे. लवकरच पुढील साठा मिळेल असा आशावाद आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबई प्रमाणे पनवेल महानगर पालिकेकडे असलेला लसीचा साठाही बुधवारी संपुष्टात आला आहे. पनवेल शहरात दिवसाला 2500 पर्यंत लसीकरण करण्यात येते. मात्र कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा संपल्याने लसीकरण बंद झाले आहे. दुसरीकडे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस 16 मार्चला देण्यात आल्याने दुसरा डोस 16 एप्रिल पासून सुरू होणार आहे. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात एकूण 21 केंद्रावर लसीकरण करण्यात येते. यामध्ये 9 शासकीय आणि 12 खाजगी केंद्राचा सहभाग आहे. आत्तापर्यंत 63 हजार 879 जणांना पनवेलमध्ये लस देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Vaccine Shortage : लसटंचाई... अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद, कोणत्या जिल्ह्यात किती साठा शिल्लक? वाचा सविस्तर
मुंबईतील 50 टक्के लसीकरण केंद्रे लसपुरवठ्याअभावी बंद, मुंबईत दीड दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा