Covaxin Vaccine | 'कोवॅक्सीन' लसीमध्ये महाराष्ट्राचं योगदान
भारत बायोटेक कंपनी विकसित करत असलेली कोरोना संसर्गावरील लसीमध्ये महाराष्ट्राचेही मोठं योगदान असणार आहे. नागपूर येथील गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यावर प्रयोग होणार आहेत.
मुंबई : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपनीला कोरोना लसीच्या मानवी चाचणी परवानगी दिली आहे. या लसीच्या मानवी चाचण्या करण्याकरिता देशातील 12 संस्थांची निवड करण्यात आली आहे. या मध्ये विशेष म्हणजे एक संस्था महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. या संस्थेचे नाव गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असे आहे. त्यामुळे या लसीची निर्मिती करण्यात आता महाराष्ट्राचेही मोठं योगदान असणार आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनी सोबत करार केला असून त्यांच्या या 'कोवॅक्सीन' Covaxin या लसीच्या मानवी चाचण्याला परवानगी दिली आहे. या हैदराबाद स्थित कंपनीने ही लस पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेबरोबर संयुक्तपणे विकसित केली आहे. या लसीच्या मानवी चाचण्या करण्याकरिता देशातील 12 संस्थांची निवड करण्यात आली आहे. या मध्ये विशेष म्हणजे एक संस्था महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. या संस्थेचे नाव गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असे आहे. निवड करण्यात आलेल्या संस्थांनी लवकरात या चाचणीकरिता स्वतःहून इच्छुक असणारे आणि कोणताही आजार नसणारे निरोगी व्यक्तीची निवड करावयाची आहे. निवड झालेल्या संस्थानी लवकरच मानवी चाचणी करण्याकरिता लागणारी आवश्यक ती कागदपत्रे देऊन परिषदेकडून परवानगी घेणं अपेक्षित आहे.
नागपूरकरांनी मानवी चाचणी करण्याकरिता पुढं यावं
या प्रकरणी गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, यांनी एबीपी माझा ऑनलाईनशी बोलताना सांगितले की, "खरं तर ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही या कोरोना या आजारावर उपयुक्त ठरणाऱ्या लसीच्या चाचणीचे काम करण्याचे भाग बनलो आहोत. या अगोदर सुद्धा आम्ही अशा पद्धतीच्या तीन लस विकसित करण्याच्या चाचण्यांमध्ये सहभाग घेऊन हे काम पूर्ण केलेलं होते. तसे बघायला गेले तर आम्हाला अशा पद्धतीने काम करण्याचा चांगला अनुभव आहे. ज्या कंपनीने आमची निवड केली आहे त्याच कंपनीबरोबर आम्ही हे काम केले आहे. सध्या फक्त अडचण एवढीच आहे की हे काम आम्हाला दीड महिन्याच्या आत करून द्यायचे आहे. मी गेली 25 वर्ष डायबेटॉलॉजिस्ट म्हणून काम करीत असून अनेक शोधनिबंध सादर केलेले आहेत. हा दीड महिन्याचा कालावधी कमी असून मानवी चाचण्या करताना अशी एक विशिष्ट डेडलाईन ठेवून काम करणं थोडं अवघड ठरू शकते. त्यामुळे आता आम्ही निश्चित सांगू शकत नाही की आम्ही त्याच वेळेत चाचण्या पूर्ण करू. कारण या काळात आम्हाला या चाचण्या करण्याकरिता निरोगी व्यक्तीची निवड करावी लागते. त्यांची सहमती घेऊन त्यांच्यावर ही चाचणी घेतली जाते. पहिल्या टप्प्यात आम्ही 30-40 जणांवर याची चाचणी करणार आहोत. अशी माणसे शोधणं अवघड असते. मात्र, माझं नागपूरमधील सर्व लोकांना आवाहन आहे की त्यांनी या मानवी चाचणी करण्याकरिता पुढे यावे आणि एक प्रकारे देशसेवेला हातभार लावावा."
Corona Vaccine | भारत बायोटेक पाठोपाठ झायडस कॅडिला कंपनीच्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीला परवानगी
मानवी चाचण्या सुरक्षित असतात
ते पुढे असेही म्हणाले की, "या चाचणीसाठी 18 ते 55 या वयोगटातील निरोगी व्यक्ती असणे अपेक्षित आहे. आमच्या अनुभवावरून सांगू शकतो की चाचण्या तशा सुरक्षित असतात. या चाचणी दरम्यान कुणा व्यक्तीस काही झाल्यास त्यांच्यावर सर्व उपचार मोफत केले जातात. त्यांच्याकरिता त्यांचा इन्शुरन्स काढून ठेवलेला असतो, तो किती असावा आणि काय यावर आज आमचे कंपनीबरोबर बोलणे होणार आहे. या चाचणीचे 2-3 टप्पे असतात. एकदा त्या व्यक्तीवर चाचणी केली की 15 दिवसाने त्याचे निकाल तपासले जातात. आम्हाला अपेक्षित असे निकाल आल्यास त्यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरवात होते. आम्ही सर्वच जण हे काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहोत. "
लस बनविण्याकरिता किंवा त्यावरील क्लीनिकल ट्रायल झाल्यानंतर मानवी चाचण्या करणे हा खरा तर महत्वाचा टप्पा मनाला जातो. कारण त्या चाचण्यांचा मानवी शरीरावर कशापद्धतीने परिणाम होतो. त्या चाचण्यांचे काय निकाल येतात यावरच त्या लसीचे यश अवलंबून असते. कारण ह्या चाचण्या भारताच्या विविध भागात केल्या जाणार आहेत. या चाचण्या ह्या 2-3 टप्प्यात केल्या जातात. ह्या चाचण्या करण्याकरिता संस्थांनी योग्य तो वेळ घेऊन करणे अपेक्षित आहे, मात्र कोरोनाचा कहर पाहता त्यांना हे काम युद्धपातळीवर करावे लागणार आहे.
Corona Vaccine | गूड न्यूज! भारतीय बनावटीची कोरोनाची लस 15 ऑगस्टपर्यंतची लॉन्च होण्याची शक्यता