Maharashtra Budget Session 2022: नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक, फडणवीसांचा हल्लाबोल
Maharashtra Budget Session 2022 Devendra Fadnavis : नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
Maharashtra Budget Session 2022 Devendra Fadnavis : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विधीमंडळाचे कामकाज सुरू झाल्यानंतर भाजपने मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. मंत्री जेलमध्ये आहे आणि राजीनामा झाला नाही असं पहिल्यांदा घडत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, हसिना पारकरला पैसे दिले आहेत, त्यातून नवाब मलिकांना अटक झाली आहे. हसिना पारकर ही दाऊदची बहीण आहे. दाऊदच्या बहिणीला पैसे देणे म्हणजे दाऊदला मदत करण्यासारखे आहे. दाऊदला समर्थन करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले की, नवाब मलिकांच्या राजीनामा मिळणार नसेल तर आम्ही सभागृह चालू देणार नाही. भाजप आमदार आशिष शेलार यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना म्हटले की, ज्यांना ईडीने अटक केली, त्यांचा राजीनामा व्हायला हवा ही मागणी लावून धरणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपर्यंत नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाहीत, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असेही त्यांनी म्हटले.
अधिवेशन वादळी ठरणार
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून रणनिती आखली गेली आहे. काल (बुधवारी) दोन्ही बाजूंकडून बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. तर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांची बैठकही मुंबईत झाली. या बैठकीत भाजपनं अधिवेशनाची रणनीती आखली असून विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.